भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकशी लग्न केले आहे, ही गोष्ट सर्वश्रूत आहे. या दोघांच्या नात्यामुळे अनेकदा दोन्ही देशांतील विविध खेळाडू सोशल मीडियावर गंमतीशीर पोस्ट करतानाही दिसतात. पाकिस्तीनचे खेळाडू सानियाला ‘वहिनी’ म्हणतात तर भारतीय खेळाडू शोएबला गमतीने ‘दाजी’ म्हणतात. सध्या असाच एक चर्चेत आला आहे. पाकिस्तानची आघाडीची टेनिसपटू मेहक खोखरने सानियाकडे मदत मागितली आहे. त्यासाठी शोएबने सानियाची मनधरणी करावी, असे आवाहनही मेहकने केले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
भारतीय टेनिस खेळाडू असलेल्या सानियाने पाकिस्तानात येऊन पाकिस्तानी महिला टेनिस संघाला प्रशिक्षण द्यावे, अशी विनंती मेहकने केली आहे. जेणेकरून पाकिस्तानची टीम चांगली कामगिरी करू शकेल. मेहकने यासाठी शोएब मलिकचीही मदत घेतली आहे. मेहकने एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, ‘येत्या काही दिवसात पाकिस्तान फेडरेशन कपसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे सतत पाकिस्तानात येणाऱ्या सानिया मिर्झाने आमच्या संघाला प्रशिक्षण दिले तर फायदा होईल.’ मेहक पुढे म्हणाली, “शोएब मलिकने सानियाच्या वहिनीला पाकिस्तान टेनिस संघाला प्रशिक्षण देण्यासाठी तयार करावे. त्याचा आम्हाला खूप फायदा होईल.”
मेहक खोखर पाकिस्तानच्या अव्वल टेनिसपटूंपैकी एक आहे. ती सानिया मिर्झासारखी ग्लॅमरस आहे. त्यामुळे ती अनेक टीव्ही शोमध्येही दिसलेली आहे. सानिया मिर्झा ही पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी असल्यामुळे ती सतत पाकिस्तानला भेट देत असते. काही काळापूर्वी सानिया मिर्झाने पाकिस्तानमध्ये बरेच दिवस वास्तव्य केले होते. शिवाय, ती अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्येही उपस्थित राहिली होती.