Pakistani Umpire Asad Rauf Death: २००६ ते २०१३ या कालावधीत ICC च्या खास पॅनेलचा भाग असलेले माजी पाकिस्तानी पंच असद रौफ यांचे लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. याबद्दल पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी ट्विट करून माहिती दिली. “असद रौफ यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. केवळ एक चांगला पंच नव्हे तर त्यांच्या मिश्किल व मस्तमौला स्वभावाने प्रत्येक भेटीत माझ्या चेहऱ्यावर हास्य कायम असायचे” असे म्हणत रमीज यांनी रौफ यांच्या आठवणींना उजाळा दिला. रमीज यांच्यासह अन्यही पाकिस्तानी क्रिकेट क्षेत्रातील दिग्जजांनी रौफ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

असद रौफ यांच्या करिअरचे काही खास क्षण

रौफ यांनी ६४ कसोटी, १३९ एकदिवसीय सामने, २८ टी-२० आणि ११ महिला टी २० सामन्यांमध्ये पंच किंवा टीव्ही पंच म्हणून काम केले. तसेच आयपीएल सामन्यांसह ४० प्रथम श्रेणी सामने, २६ लिस्ट ए सामने अशा एकूण ८९ टी-२० सामन्यांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.

इतकंच नाही तर रौफ यांनी करिअरच्या सुरुवातीला पाकिस्तानी क्रिकेट संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही त्याने देशांतर्गत कारकीर्द यशस्वी केली. रौफ यांनी ७१ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि ३४२३ धावा केल्या. लिस्ट एच्या ४० सामन्यांमध्ये ६११ धावांचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे.

असद रौफ यांच्यावर बलात्काराचा आरोप

असद रौफ यांच्यावर मुंबईतील एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. रौफ यांनी लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी अनेक महिने शारीरिक संबंध ठेवले होते अशी तक्रार लीना कपूर या मॉडेलने पोलिसांकडे दाखल केली होती.

लीनाने तक्रारीत सांगितल्यानुसार, सहा महिन्यांपूर्वी श्रीलंकेत रौफशी तिची भेट झाली. इंडियन प्रीमियर लीग नंतरच्या वारंवार भारत भेटी दरम्यान ते जवळ आले. रौफ, विवाहित आणि दोन मुलांचे वडील असताना, त्यांनी कथितपणे तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, नातेसंबंधाचा पुरावा म्हणून मॉडेलने पंचांसह तिचे फोटोदेखील सादर केले होते. हे फोटो खरे असल्याचे रौफ यांनी मान्य केले होते मात्र अशाप्रकारे कोणतेही वचन दिल्याच्या दावे खोटे असल्याचे ते म्हणाले होते. २०१३ मध्ये लीना यांनी आपली तक्रार मागे घेतली होती.

शेवटच्या काळात विकत होते शूज

२०१६ पासून आयसीसीने आजीवन बंदी घातल्यावर असद रौफ हे २०२२ मध्ये पाकिस्तानमध्ये शूज विकताना दिसले होते. याबाबत पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी खास बातचीत करत त्यांनी सांगितले होते की ‘मी हे काम माझ्यासाठी नाही तर माझ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी करतो. मी माझे आयुष्य पंच म्हणून काम करताना घालवले. अनेक देशांना भेटी दिल्या. माझ्या आयुष्यात असे काही राहिले नाही जे मी केले नाही. आयपीएल २०१३ मध्ये, बीसीसीआयने सट्टेबाजांशी संपर्क आणि सट्टेबाजांकडून भेटवस्तू घेण्याच्या आरोपांवरून स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात रौफ यांच्यावर आरोप केले होते.