क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांनी घडवून आणलेल्या ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात पंचांचा समावेश असल्याचेही पुरावे आता मिळू लागले आहेत. पाकिस्तानचे पंच असद रौफ यांना सट्टेबाजांनी महागडय़ा वस्तू दिल्याचे अभिनेता विंदू दारा सिंग याने चौकशीत कबूल केल्यामुळे आयसीसीने त्यांची इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून उचलबांगडी केली आहे. याशिवाय अजित चंडिलाला गेल्या वर्षी १२ लाख रुपये मिळाल्याचे उघडकीस आल्यामुळे आयपीएलच्या पाचव्या हंगामामध्येही ‘स्पॉट-फिक्सिंग’ झाल्याचे स्पष्ट होत आहे. याचप्रमाणे आणखी तीन खेळाडू आणि आयपीएलमधील एक संघ पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी देशभरात विविध ठिकाणी छापे घालून ३६ सट्टेबाजांना अटक केली आहे. पुण्यातून चार, नाशिकमध्ये पाच तर ठाण्यातून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
आयपीएलसंदर्भातील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने गुरुवारी नाटय़मय वळण घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या चौकशीत रडारवर असलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ यांची आयसीसीने इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेतून हकालपट्टी केली आहे.
आयपीएलमध्ये ‘स्पॉट-फिक्सिंग’ केल्याप्रकरणी एस. श्रीशांतसहित राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणात रौफ यांचे नाव आल्यामुळे आठवडय़ाभरातच आयसीसीने ही कारवाई केली आहे.
‘‘मुंबई पोलिसांच्या ‘स्पॉट-फिक्सिंग’ संदर्भातील चौकशीत असद रौफ यांचे नाव आढळले आहे. या पाश्र्वभूमीवर आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेपासून रौफ यांना दूर ठेवण्यात आले आहे,’’ अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी दिली. इंग्लंडमध्ये ६ ते २४ जून या कालावधीत होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी रौफ यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.रौफ यांचा इतिहास हा वादग्रस्त असाच आहे. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे आरोप मॉडेल लीना कपूरने त्यांच्यावर गेल्या वर्षी केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा