पाकिस्तनाचा धडाकेबाज फलंदाज बाबर आझम याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर विक्रमाच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. त्याने टी२० क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे. बाबर आझमने टी२० क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पूर्ण केला. या बरोबरच टी२० क्रिकेटमध्ये बाबर आझम सर्वात जलद १००० धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज ठरला आहे.

दुबईत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याने न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या टी२० सामन्यात हा पराक्रम केला. त्याने या सामन्यात ५८ चेंडूत ७९ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. आपल्या खेळीत ४८वी धाव घेत त्याने कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या. बाबरने २६ डावांमध्ये हा विक्रम केला आणि विराटचा विक्रम मोडला. विराटला हा टप्पा गाठण्यासाठी २७ डाव खेळावे लागले होते.

सध्या कोहलीच्या टी२० क्रिकेटमध्ये ४८.८८च्या सरासरीने २१०२ धावा आहेत. तर बाबरच्या ५४.२६च्या सरासरीने १०३१ धावा झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या दोघशांनीही अद्याप टी२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले नाही.