Saeed Ajmal’s Statement on Harbhajan and Ashwin: आजपर्यंत क्रिकेट जगतात असे अनेक गोलंदाज आले आहेत, ज्यांना बॉलिंग ॲक्शनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या यादीत श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावाचाही समावेश आहे. मुरलीधरनला ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करण्यास मनाई करण्यात आली होती. आता पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने हरभजन आणि अश्विनसह अनेक गोलंदाजांची बॉलिंग ॲक्शन बेकायदेशीर असल्याचा मोठा दावा केला आहे.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलने ‘नादिर अली पॉडकास्ट’ यूट्यूब चॅनलवर याचा खुलासा केला. मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खुद्द सईद अजमलची बॉलिंग ॲक्शन संशयास्पद आढळली होती. त्यामुळे २०१४ मध्ये अजमलच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर अजमल क्रिकेटमध्ये परतला, पण तो पूर्वीसारखा प्रभावी राहिला नव्हता.
आता अजमलने बेकायदेशीर बॉलिंग ॲक्शनबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मी २०-२५ गोलंदाजांची नावे सांगू शकतो, जे असे करत होते. या यादीत ४००-५०० बळी घेणारे गोलंदाजही आहेत. हरभजन सिंग, अश्विन, नरेन आणि मुथय्या मुल्रीधरन यांसारख्या खेळाडू मेडिकल कंडीशनमध्ये होते. वेगवान गोलंदाजांमध्ये कर्टली अॅम्ब्रोस हा काही औरच आहे. गोलंदाजी करताना तो हात झटकत असे. त्याची बॉलिंग ॲक्शन बेकायदेशीर होती.
माजी पाकिस्तानी फिरकीपटूने पुढे स्पष्ट केले की, त्याला कारवाईनंतर गोलंदाजी करण्याची परवानगी कशी मिळाली, परंतु नंतर ती देखील परत घेण्यात आली. अजमल म्हणाला, “माझी एक मेडिकल कंडीशन होती. माझा खांदा, मनगट आणि हात पूर्णपणे व्यवस्थित नव्हते. ज्याचा खांदा ९० अंशापर्यंत वाकतो, तो वाकल्याशिवाय खांदा उचलू शकत नाही. या मेडिकल कंडीशनमुळे मला गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाली.”
अजमल पुढे म्हणाला, “मी असाच खेळत राहिलो. जेव्हा मी ४४८ आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या, तेव्हा त्यांना आठवले की अजमलची ॲक्शन योग्य नाही. याबाबत मी श्रीलंकेतील रेफ्रीशी बोललो. रेफरीने मला एक पत्र दिले, ज्यामध्ये मेडिकल कंडीशनची अट तुम्हाला लागू होत नाही असे लिहिले होते. मी कारण विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, मुरलीधरन निवृत्त झाला आहे. त्याला काही मेडिकल कंडीशन देखील होती. त्यामुळे त्यांनी नियम काढून टाकला.”