Pakistan’s name will be on the jersey of Team India: आशिया चषक २०२३ या स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी फक्त २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशात आशिया चषकसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. पण दोन सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी यावेळी टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. वास्तविक, स्पर्धेतील आशिया कपच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल. टीम इंडियाच जर्सीवर पहिल्यांदाच पाकिस्तानचे नाव छापले जाणार आहे. या मागे काय कारण आहे, जाणून घेऊया
आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे –
वास्तविक, यावेळी पाकिस्तान आशिया कपचे यजमानपद भूषवत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना २०२३ च्या हंगामासाठी त्यांच्या जर्सीवर आशिया कपचा लोगो लावावा लागेल. त्याचबरोबर लोगोच्या खाली यजमान संघाचे नाव असणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवरही पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल. अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी हा एक नवीन अनुभव असेल. याआधी २०२२ मध्ये आशिया चषक झाला, तेव्हा सर्व जर्सीवर श्रीलंकेचे नाव लिहिले होते.
भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार –
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. त्याचवेळी भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी पाकिस्तान श्रीलंकेत येणार आहे. मात्र उर्वरित संघांसोबतच ते आपले सर्व सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. त्याचबरोबर १० सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना कोलंबोमध्ये होणार आहे.
लवकरच टीम इंडियाची घोषणा होऊ शकते –
आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. पण असे सांगितले जात आहे की १६ ते १७ ऑगस्ट दरम्यान बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा करू शकते. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून आशिया चषक संघाची घोषणा केली जाऊ शकते. कारण यंदा आशिया चषक एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे या संघात अनेक मोठे खेळाडू पुनरागमन करू शकतात.
हेही वाचा – Rohit Sharma: पत्नी रितिकासह लॅम्बोर्गिनीमधून फिरताना दिसला रोहित शर्मा, VIDEO होतोय व्हायरल
आशिया स्पर्धेत सहा संघ होणार सहभागी –
या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. सर्व संघांची ३-३ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळला गट-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-४ स्टेजचा समावेश असेल.