Pakistan World Cup Squad: पाकिस्तानने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आशिया चषकादरम्यान दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज नसीम शाह या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, दुखापतीने त्रस्त असलेल्या हारिस रौफचा संघात समावेश करण्यात आला आहे. हसन अली आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. फखर जमानच्या खराब कामगिरीमुळे संघात त्याच्या स्थानाबाबत साशंकता होती, मात्र निवड समितीने त्याला पाठिंबा दिला असून तो विश्वचषक संघाचा भाग आहे.
पाकिस्तानने विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात बाबर आझमला कर्णधार बनवले आहे आणि दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या जागी हसन अलीला संघात स्थान मिळाले आहे, जरी दुसरा जखमी गोलंदाज हारिस रौफचा समावेश करण्यात आला आहे. याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या उस्मान मीरच्या रूपात पाकिस्तानने अतिरिक्त लेग स्पिनरचाही समावेश केला आहे, परंतु त्याला आशियाई संघात स्थान मिळाले नव्हते. फिरकी गोलंदाजी अष्टपैलू मोहम्मद नवाजनेही आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे, तर फहीम अश्रफला या संघात स्थान मिळालेले नाही.
‘या’ १५ खेळाडूंची पाकिस्तानच्या विश्वचषक २०२३ संघात निवड झाली आहे
पाकिस्तानने बाबर आझमला विश्वचषक २०२३ साठी आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. फखर जमान आणि इमाम उल हक यांची सलामीची जोडी म्हणून निवड करण्यात आली आहे. सौद शकील आणि अब्दुल्ला शफीक यांचाही फलंदाजांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी मोहम्मद रिझवानकडे देण्यात आली आहे. तर फिरकीची जबाबदारी शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
इफ्तिखार अहमद आणि उस्मान मीर यांना फिरकी अष्टपैलू म्हणून स्थान मिळाले आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजीची जबाबदारी हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांच्या खांद्यावर असेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ट्वीटरवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आणि विश्वचषक २०२३साठी आपला संघ जाहीर केला.
नसीम शाह बाहेर पडणे पाकिस्तानसाठी धक्कादायक
पाकिस्तान निवड समितीचे प्रमुख इंझमाम यांनी, वेगवान गोलंदाज नसीम शाहला विश्वचषक संघातून वगळल्याने खूप मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. ईएसपीएनच्या वृत्तानुसार, इंझमाम नसीमबद्दल म्हणाला, “नसीमला दुखापत झाली असल्याने आम्ही त्याला वगळले आहे, तो आमचा मुख्य गोलंदाज होता आणि हे खूप दुर्दैवी होते. हसनैनच्या घोट्याला दुखापत झाली असून तो जखमी आहे आणि इहसानुल्लालाही दुखापत झाली आहे.”
नसीमच्या जागी हसन अलीच्या एलपीएल किंवा इतर कामगिरीबद्दल जर बोलायचे झाले तर त्याने इतर खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तो एक अनुभवी गोलंदाज आहे ज्याने पाकिस्तानसाठी मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत आणि त्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जेव्हा नसीम बाहेर पडला तेव्हा आम्हाला नवीन चेंडूने गोलंदाजी करू शकेल अशा व्यक्तीची गरज होती. तो जुन्या आणि नवीन दोन्ही चेंडूंवर चांगली गोलंदाजी करतो, त्याची उपस्थिती संघाला ऊर्जा देते.” नसीमच्या दुखापतीबाबत इंझमाम म्हणाला, “दुर्दैवाने, आमच्या डॉक्टरांच्या अहवालानुसार आम्ही ऐकले आहे की, नसीम वर्ल्ड कपनंतरही बराच काळ बाहेर राहणार आहे. सध्या माझ्या दृष्टीने तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. हे पाकिस्तानचे नुकसान आहे आणि आम्हाला आशा आहे की तो लवकरच फिट होईल.”
पाकिस्तानने विश्वचषक संघाची घोषणा करण्यास उशीर का केला?
आशिया चषक २०२३नंतर संघाची घोषणा करणार असे आधीच पाकिस्तानने जाहीर केले होते. एका आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला असल्याने पाकिस्तानने संघाची घोषणा न करणे हा चर्चेचा विषय होता. मात्र, यामागे पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हारिस रौफ यांची दुखापत असल्याचे मानले जात होते, कारण विश्वचषक संघाची घोषणा होण्यापूर्वी हे दोन खेळाडू तंदुरुस्त असावेत, अशी पीसीबीची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० पैकी भारत आणि पाकिस्तानसह ८ संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत, फक्त बांगलादेश आणि श्रीलंका या दोन संघांनी अद्याप त्यांचे विश्वचषक संघ घोषित केलेले नाहीत.
पाकिस्तान विश्वचषक संघ
फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी. हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली