पॅलेस्टाइन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर युद्धाचेच प्रसंग उभे राहतात. मात्र रॉकेट्स व बॉम्बच्या समर प्रसंगांना नेहमीच सामोरे जात वासिम अलमासी हा अ‍ॅथलेटिक्समध्ये आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवू पाहात आहे. अलमासी हा २२ वर्षीय खेळाडू पुण्यात चालू असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेतील १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाला आहे. पॅलेस्टाइनच्या मुक्ती संग्रामात त्याच्या कुटुंबातील अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे त्याला युद्धप्रसंगांचे वावडे आहे. म्हणूनच त्याने अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द करीत पॅलेस्टाइनला नावलौकिक मिळवून देण्याचा चंग बांधला आहे.
गाझा पट्टीतच वासिमचे घर असल्यामुळे अनेक वेळा त्याला आणीबाणीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे त्याने जॉर्डनमध्ये राहून सराव करण्याचा निर्णय घेतला. गेली तीन वर्षे तो मध्यम अंतराच्या स्पर्धावर लक्ष केंद्रित करीत आहे. त्याने आतापर्यंत अरेबिक अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगले यश मिळविले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला थोडेफार प्रायोजकही मिळाले आहेत. त्याचे वडील खमीस यांचा गाझा पट्टीत कपडय़ांचा छोटासा व्यवसाय आहे तर त्याची आई स्वाद ही गृहिणी आहे. त्याच्या अ‍ॅथलेटिक्स कारकीर्दीला कुटुंबीयांचा भरघोस पाठिंबा मिळाला आहे.
रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ८०० व १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक मिळविण्याचे त्याचे ध्येय आहे. कतार अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष दहलान अल हमाद यांची आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तो खूप खूष झाला आहे. त्यामुळे त्याला आपल्याला चांगले पुरस्कर्ते मिळतील अशी त्याला आशा वाटू लागली आहे. अल हमाद यांनी अरेबियन देशांमधील नैपुण्यवान खेळाडूंसाठी परदेशातील प्रशिक्षण तसेच परदेशी प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. त्याचा फायदा आपल्याला मिळेल, असे अलमासीने सांगितले.
 वासिमचे व्यवस्थापक डॉ. एल.एस नाडेर हे आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सदस्य आहेत. ते म्हणाले, ‘‘अलमासी याच्याकडे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी पुष्कळ नैपुण्य आहे. त्याला युरोपियन देशांमध्ये प्रशिक्षणासाठी आम्ही पाठविणार आहोत.’’

Story img Loader