भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने शनिवारी मलेशिया येथे पार पडलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये बिलियर्ड्सच्या अंतिम फेरीत देशबांधव सौरव कोठारीचा ४-० असा पराभव करून कारकिर्दीतील २५वा जागतिक करंडक जिंकला. अडवाणीने चमकदार खेळ केला आणि कोठारीला संधी देणार नसल्याचे पहिल्याच फ्रेमपासून आपले इरादे स्पष्ट केले. या १५० पेक्षा जास्त प्रकारामध्ये अडवाणीने १४९ च्या ब्रेकसह पहिली फ्रेम घेतली. तोपर्यंत कोठारी यांनी खातेही उघडले नव्हते.
सौरवला त्याच्या पहिल्या आयबीएसएफ (आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ) जागतिक किताबाची प्रतीक्षा आहे. या बेस्ट ऑफ सेव्हन अंतिम सामन्यामध्ये, अडवाणीने सुरुवातीपासूनच आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि एका कॅलेंडर वर्षात पाचव्यांदा बिलियर्ड्स राष्ट्रीय, आशियाई आणि जागतिक ट्रॉफी जिंकण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला. कोठारीला दुसऱ्या फ्रेममध्ये काही संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा त्याला उठवता आला नाही. दुसरीकडे अडवाणीने ७७ च्या ब्रेकच्या मदतीने २-० अशी आघाडी घेतली. यानंतर अडवाणींचा खेळ आणखी उत्तम होत गेला आणि त्याने आपल्या कौशल्याने मलेशियाच्या प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केले.
अडवाणीने तिसऱ्या फ्रेममध्ये १५३ धावांचा स्पर्धेतील सर्वोच्च ब्रेक केला, ज्यामुळे तो किताबापासून केवळ एक फ्रेम दूर होता. चौथ्या फ्रेममध्ये ८० आणि ६० असे दोन ब्रेक घेत अडवाणीने ट्रॉफी जिंकली. कोठारीची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि त्याने केवळ ७२ गुण मिळवले. दुसरीकडे, अडवाणीने ६६० हून अधिक गुण मिळवत किताब जिंकला.
हेही वाचा : Good News: टेनिस जगताचा बादशाह राफेल नदालच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन
कोविड-१९ मुळे २०१९ मध्ये शेवटची वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळली गेली होती. अडवाणी यांनी याआधी १२ महिन्यांपूर्वी कतारमध्ये शेवटची वर्ल्ड ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्याने आयबीएसएफ ६-रेड स्नूकर वर्ल्ड कपमध्ये ट्रॉफी जिंकली. या यशानंतर पंकज अडवाणी म्हणाले की, “मी ज्या प्रकारचा खेळ दाखवला आणि यावर्षी प्रत्येक बिलियर्ड्स स्पर्धेत मी ज्याप्रकारे ट्रॉफी जिंकली त्यामुळे मी खूश आहे. जागतिक स्तरावर माझ्या देशासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकल्याचा मला अभिमान वाटतो. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.”