पंकज अडवाणीने अंतिम फेरीत बी. भास्करवर ६-१ अशा फरकाने मात करत आशियाई बिलीअर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजयासह पंकजने आपलं विजेतेपद यंदाच्या वर्षीही कायम राखलं आहे. दुसरीकडे महिलांच्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमी कमानीने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला ३-० ने पराभवाचं पाणी पाजलं.
आशियाई पातळीवर पंकज अडवाणीचं हे अकरावं सुवर्णपदक ठरलं आहे. पहिला सेट गमावल्यानंतरही पंकजने भास्करच्या चुकांचा फायदा घेत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये पंकज अडवाणीने भास्करला एकही गुण मिळवण्याची संधी न हेता चारीमुंड्या चीत केलं. चौथा आणि पाचवा सेट गमावल्यानंतरच भास्करच्या सामन्यात पुनरागमनाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या. या विजयानंतर पंकज अडवाणीने, आपल्या कामगिरीत सातत्य राखून देशाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.