मुंबई : वडाळ्याच्या एस. पी. रोडवरील गणेशनगर या १० बाय १०च्या बैठय़ा घरांच्या वसाहतीतील असंख्य लहान-मोठय़ा मुलांमध्ये आता कबड्डीमुळे आयुष्य पालटू शकते, असा विश्वास निर्माण झाला आहे. कारण येथील एसएसजी स्पोर्ट्स क्लबच्या पंकज मोहितेने हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठावर पुणेरी पलटणकडून खेळताना आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे.
पंकजच्या वडिलांचे २०१२ मध्ये हृदयविकारामुळे निधन झाले. परंतु या कठीण परिस्थितीत पंकजची आई खंबीरपणे उभी राहिली. चार मुली आणि एक मुलगा अशा कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी तिने कार्यालयीन साहाय्यकाची नोकरी पत्करली. आता पंकज एअर इंडियात नोकरी करतो आणि प्रो कबड्डीच्या माध्यमातूनही मानधन मिळाल्याने त्याने आईला नोकरी करू नकोस, असे बजावले आहे.
‘‘पंकजची प्रगती पाहून आता समाधान वाटते. परिसरातील सर्वाना पंकजचा अभिमान वाटतो. दररोज सायंकाळी पंकजचा खेळ पाहण्यासाठी आम्हा सर्वाना उत्सुकता असते,’’ असे पंकजची आई दीपाली मोहिते यांनी सांगितले.
आयईएस दिगंबर पाटकर विद्यालयात शालेय शिक्षण घेत असताना पंकजला कबड्डीची आवड निर्माण झाली. त्याच्या एसएसजी संघातील अनुभवी खेळाडू संदेश घाडगे आणि सुशील किरूलकर यांचेही त्याला मार्गदर्शन मिळत गेले. आधी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये तो आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवू लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीपर्यंत प्रतिनिधित्व केल्यानंतर एम. डी. महाविद्यालयाकडून तो खेळू लागला. राजेश पाडावे यांनी त्याच्या गुणवत्तेला पैलू पाडत त्याला देना बँकेच्या संघातही स्थान दिले. मग एअर इंडिया संघाकडून खेळताना संजय सूर्यवंशी यांनी त्याला व्यावसायिक कबड्डीचे धडे दिले.
पंकजने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत एकूण ३९ गुण मिळवले आहेत. प्रो कबड्डीमधील आतापर्यंतच्या वाटचालीबाबत पंकज म्हणाला, ‘‘प्रो कबड्डी लीग सुरू झाल्यापासून यात खेळण्याची मला उत्सुकता होती. ते स्वप्न साकारल्याचा अत्यंत आनंद होत आहे. कुशल नेतृत्व आणि हुकमी चढायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुप कुमार यांचे मार्गदर्शन येथे मिळते आहे. आता भारताकडून खेळण्याचे ध्येय जोपासले आहे.’’