विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात करुन ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली. फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले, तर भारताच्या सर्व गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडलं. भारताच्या दृष्टीकोनातून आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, ऋषभ पंत. मधल्या फळीत फलंदाजी, यष्टीरक्षणादरम्यान खडूस कांगारुंना स्लेजिंग करुन सतावणं यासारख्या गोष्टींमधून पंतने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पंतच्या कामगिरीचं कौतुक केलं असून भारतीय संघात त्याचं भविष्य उज्वल असल्याचं गांगुलीने म्हटलं आहे.

“भविष्यकाळा ऋषभ भारतीय संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि भविष्यातही तो अशीच कामगिरी करेल याची मला खात्री आहे.” बंगाल विरुद्ध पंजाब रणजी सामन्यादरम्यान सौरव पीटीआयशी बोलतं होता. पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे भारतीय संघाला सिडनी कसोटीत कांगारुंवर मात करण्याची संधी गमवावी लागली. 4 सामन्यांच्या मालिकेत 7 डावांमध्ये पंतने 350 धावा काढल्या आहेत. चेतेश्वर पुजारानंतर मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. याचसोबत यष्टींमागेही पंतने आपली कमाल दाखवली असून, त्याने 20 झेल घेत कसोटी मालिकेत यष्टींमागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिकाही भारताला 1-1 अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. मात्र कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित करुन 2-1 ने बाजी मारली. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी महेंद्रसिंह धोनीने संघात पुनरागमन केलं असून, ऋषभ पंतला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : मालिका विजयानंतर टीम इंडियात Vacancy, विराट म्हणतो संघात अजून 3 गोलंदाज हवेत

Story img Loader