इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाचा अनुभव ऋषभ पंतच्या कारकीर्दीला वेगळ्या उंचीवर नेईल. यामुळे तो क्रिकेटपटू म्हणूनही अधिक परिपक्व होईल, अशी आश्वासक प्रतिक्रिया संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली.
भारताच्या २३ वर्षीय धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज पंतची मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी प्रथमच नियुक्ती करण्यात आली. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार असल्याने पंत आता दिल्लीचे नेतृत्व करताना दिसेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये पंतने दमदार कामगिरी करून टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यामुळे आता नेतृत्वपदाचा अनुभव पंतसाठी अधिक लाभदायक ठरेल, असे पाँटिंगला वाटते.
‘‘श्रेयसची आम्हाला नक्कीच उणीव जाणवेल. परंतु पंतसाठी स्वत:ला सिद्ध करण्याचीही सुवर्णसंधी आहे. त्याच्या क्षमतेविषयी मला कधीच साशंका नव्हती. विशेषत: गेल्या काही महिन्यांतील कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास फार दुणावला आहे,’’ असे पाँटिंग म्हणाला.
‘‘त्यामुळे दिल्लीच्या कर्णधारपदाचा अनुभव पंतच्या कारकीर्दीला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. पूर्वीपेक्षा तो आता फार प्रगल्भ झाला असून यंदाची ‘आयपीएल’ त्याला सर्वांगीण विकासासाठी लाभदायक ठरेल,’’ असेही पाँटिंगने सांगितले.
पंत भारताच्या यशाचा शिल्पकार -रिचडर््स
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन अव्वल क्रमांकाच्या संघांविरुद्ध भारताने मिळवलेल्या यशाचा खरा शिल्पकार ऋषभ पंत आहे, अशी स्तुतिसुमने वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर व्हिव रिचडर््स यांनी उधळली. ‘‘गेल्या चार महिन्यांचा काळ भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय होता. ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने पिछाडीवरून जिंकली. यामध्ये पंतचे मोलाचे योगदान होते. त्यानंतर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेतसुद्धा त्याने छाप पाडली,’’ असे रिचडर््स म्हणाले.