पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेळेमध्ये निवडणूक न घेतल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने शनिवारी भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुढील महिन्यात भारतात अपेक्षित असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन संकटात आले आहे.पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धा ६ ते १५ मार्चदरम्यान कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर अपेक्षित आहे. या स्पर्धेचे प्रथमच भारताता आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून पॅरिस ऑलिम्पिकसाठी २४ कोटा स्थान निश्चित होणार आहेत. या स्पर्धेत ५२ देशातील ५०० हून अधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. भारताचे आघाडीचे नेमबाजही या स्पर्धेतून ऑलिम्पिक प्रवेशासाठी उत्सुक आहेत.

या स्पर्धेसाठी ‘पीसीआय’ प्रवेशिकांची छाननी, खेळाडूंच्या व्हिसा मान्यता, राहण्याची सुविधा या सगळय़ा गोष्टी करण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच केंद्र सरकारने घेतलेल्या बरखास्तीच्या निर्णयामुळे या स्पर्धेचे संयोजन संकटात आले आहे.राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘पीसीआय’ अंतर्गत निवडणूका घेण्यास असमर्थ ठरल्याने क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली. ऑलिम्पिकपटू दीपा मलिक यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीची मुदत ३१ जानेवारीसच संपली आहे. मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. वास्तवात ‘पीसीआय’ने २८ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा केली आहे.

हेही वाचा >>>SL vs AFG : क्रिकेटच्या मैदानात दिसले अनोखे दृश्य, पुतण्याने काकाला दिली पदार्पणाची कॅप; दोघांनी साकारली शतकी भागीदारी

पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमुळे निवडणुकीस लांबणीवर टाकल्याचे क्रीडा मंत्रालयास सूचित केले होते, असे ‘पीसीआय’ सचिव गुरुशरण सिंग यांनी म्हटले आहे. या स्पर्धेसाठी १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील पाच कोटी रुपये प्रायोजकांकडून उभे राहतील असा अंदाज होता. पण, सरकारच्या निर्णयामुळे सगळय़ाच अडचणी निर्माण झाल्या आहेत. बरखास्तीचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने आम्हाला एकदा तरी सूचित करायला हवे होते, पण त्यापैकी काहीच घडलेले नाही. आता इतक्या अल्पावधीत ही स्पर्धा दुसरे कुणी आयोजित करू शकेल असे वाटत नाही, असेही गुरुशरण सिंग म्हणाले.

हेही वाचा >>>रणजी सामन्यात सौराष्ट्रकडून महाराष्ट्राचा दारूण पराभव, पार्थ भूटचे सात बळी; धर्मेंद्र जडेजा सामनावीर

विशेष म्हणजे क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्हाला ना हरकत प्रमाणपत्रही दिले आहे. मग, हे सगळे कशासाठी. पॅरालिम्पिक घटना आणि राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांनुसार अपरिहार्य कारणामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची तरतूद आहे. याचा विचार का केला जात नाही, असा प्रश्नही गुरुशरण सिंग यांनी उपस्थित केला. दरम्यान, या संदर्भात क्रीडा प्राधिकरणाचे संचालक संदीप प्रधान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आमच्याकडे शनिवारी अखेरच्या दिवसापर्यंत स्पर्धेसाठी प्रवेशिका येत होत्या. आता अगदी ऐनवेळी स्पर्धेच्या आयोजनास नकार देणे हे योग्य होणार नाही. यामुळे आपले नाव खराब होणार आहे. आम्हाला काही करून या स्पर्धा घ्याव्या लागतील. अन्यथा आंतरराष्ट्रीय पॅरा समितीच्या रोषास आम्हाला सामोरे जावे लागेल. –गुरुशरण सिंग, सचिव, भारतीय पॅरालिम्पिक समिती

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Para shooting world cup hosts in crisis amy
Show comments