पॅरिस : कठोर मेहनत, सरावातील सातत्य यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हार न मानण्याची प्रवृत्ती हीच भारताचा उंच उडीतील पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रवीण कुमारची खरी ताकद ठरते.पॅरालिम्पिक स्पर्धेपूर्वी तीन महिने आधी प्रवीण मांडीच्या दुखापतीने बेजार होता. स्पर्धेत सहभागी होता येणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जागतिक स्पर्धेत याच कारणामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, पण पॅरालिम्पिकचे तिकीट मिळाले.

यानंतरही प्रवीणसमोर भविष्यात काय लिहिले आहे हे तोदेखील सांगू शकत नव्हता. पण, अपंगात्वर जिद्दीने मात करून इथपर्यंत मजल मारताना प्रवीणने कधीही हार मानली नव्हती. हार मानणे हे त्याच्या शब्दकोशातच नव्हते. त्यामुळेच एकदम सकारात्मक मानसिकता ठेवून प्रशिक्षक सत्यपाल सिंह यांच्या पाठिंब्याच्या जोरावर प्रवीणने सर्वोत्तम प्रयत्न केले. दुखापतीवर उपचार करण्यासाठी एमआरआय चाचणी केली आणि त्याच्या अहवालानुसार सरावाला सुरुवात केली आणि १५ दिवसांच्या आत प्रवीण पॅरालिम्पिकच्या सरावासाठी सज्ज झाला. या सज्जतेचे त्याने शुक्रवारी पॅरालिम्पिक सुवर्णपदकात परिवर्तन केले आणि आपले सोनेरी यशाचे स्वप्न साकार केले.

हेही वाचा >>>R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल

‘‘इतक्या सगळ्या प्रवासानंतर आशियाई विक्रमासह सुवर्णपदक मिळवणारा प्रवीण प्रशिक्षकांना विसरला नाही. माझ्या यशाचे सगळे श्रेय प्रशिक्षक सत्यपाल सिंह यांनाच आहे. माझे प्रायोजक, फिजिओ यांनीही माझ्यासाठी मनापासून मेहनत घेतली. सातत्याने माझ्या पाठीशी उभे राहिले. या सर्वांमुळेच मी हे यश मिळवू शकलो,’’ असे प्रवीण म्हणाला.

जन्मत:च प्रवीणचा एक पाय लहान होता. मात्र, याचे दु:ख कधीही प्रवीणने समोर आणले नाही आणि त्याच्या कुटुंबीयांनीदेखील कधी भांडवल केले नाही. ‘‘कुटुंबीयांनी सातत्याने मला प्रोत्साहनच दिले. मी येथे सुवर्णपदक जिंकावे अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. पॅरिसला जाताना पदक मिळाले नाही, तरी चालेल वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करून दाखव असे त्यांनी सांगितले होते. जेव्हा सुवर्णपदक मिळवले, तेव्हा डोळे मिटल्यावर सर्वप्रथम माझ्या पालकांचाच चेहरा डोळ्यासमोर आला,’’ असेही प्रवीण सांगितले.