यंत्रमानवाप्रमाणे भासणाऱ्या पोलादी वेशात बहुविकलांग व्यक्ती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या उद्घाटन सोहळ्यात पहिली किक मारणार आहे. अर्धागवायूच्या झटक्यानंतर व्यक्तीला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. ब्राझीलचे डॉ. मिग्युएल निकोलिस यांच्या नेतृत्वाखालील जगातील १५६ वैद्यकतज्ज्ञांनी या पोशाखाची निर्मिती केली आहे.
गुरुवारी साओ पावलो येथे होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात पक्षाघातातून सावरू पाहणारी ही व्यक्ती चाकांच्या खुर्चीवरून नव्हे, तर खास पोलादी पोशाख परिधान करून या स्पध्रेतील पहिली किक मारणार आहे. सदर व्यक्तीची ओळख गुप्त राखण्यात आली आहे.
‘‘या पोशाखाच्या पायांवर इलेक्ट्रॉनिक सर्किट्सची रचना करण्यात आली असून, त्यांचे संकेत मेंदूला पाठवले जातील. एखाद्या स्टेडियममध्ये अशी करामत साकारणे, हे आमच्यापुढील नवे आव्हान होते,’’ अशी माहिती डय़ूक विद्यापीठाचे मेंदूशास्त्रज्ञ निकोलिस यांनी दिली. निकोलिस यांनी १९८४मध्ये डॉक्टरकी मिळवण्यासाठी सादर केलेल्या प्रबंधात हा अभ्यास सुरू केला होता. २००२मध्ये अशा प्रकारच्या पोशाखाची निर्मिती करण्याचे त्यांनी निश्चित केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘२००९मध्ये ब्राझील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे यजमानपद सांभाळणार असल्याचे मला कळवण्यात आले. ब्राझीलचे वेगळेपण आपल्याला प्रत्येक कार्यक्रमातून दाखवायचे आहे, असे त्यांनी मला सांगितले. फुटबॉलवर आधारित हीच मानवी क्षमता दाखवून देण्याचे मग मी ठरवले.’’
निकोलिस यांनी या पोशाखी यंत्राचे नाव ‘ब्रा-सांतोस डय़ुमाँ’ असे ठरवले आहे. यापैकी पहिली अक्षरे ब्राझील या देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि अल्बेतरे सांतोस-डय़ुमाँ हा या देशातील विमान संशोधक. निकोलिसच्या या संशोधनात्मक उपक्रमावर काही मंडळी टीकासुद्धा करीत आहेत. परंतु त्याचा निश्चय दृढ आहे.
अपंगत्वावर विश्वचषकाची पोलादी मात; बहुविकलांग व्यक्तीच्या किकने उद्घाटन होणार
यंत्रमानवाप्रमाणे भासणाऱ्या पोलादी वेशात बहुविकलांग व्यक्ती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या उद्घाटन सोहळ्यात पहिली किक मारणार आहे. अर्धागवायूच्या झटक्यानंतर व्यक्तीला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
First published on: 10-06-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paraplegic in iron man suit set for first kick at world cup