प्राचीन ऑलिम्पिया : खराब हवामानामुळे सूर्यप्रकाशाशिवायच मंगळवारी दक्षिण ग्रीसमधील प्राचीन ऑलिम्पिक खेळांच्या केंद्रावर यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची ज्योत पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करण्यात आली. परंपरेनुसार, सूर्याची किरणे एका आरशात साठवून घेतली जातात आणि त्या किरणांच्या मदतीने ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यात येते. मात्र, यंदा हवामान खराब असल्यामुळे आदल्या दिवशीच एक ज्योत प्रज्वलित करून ठेवण्यात आली होती. परंपरेनुसार, प्राचीन ग्रीक पुजाऱ्याचा वेश परिधान केलेल्या अभिनेत्री मेरी मिनाने ही ज्योत स्वीकारली. ग्रीक सूर्यदेवतेची प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर यापूर्वीच प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीवर ती पेटविण्यात आली. खराब हवामानामुळे या वेळी सूर्यकिरणांऐवजी आधीच एका प्राचीन ग्रीक भांडयात आग तयार करण्यात आली होती. मंगळवारी ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम झाल्यावर काही मिनिटांतच स्वच्छ सूर्यप्रकाश पडला.
या प्राचीन ऑलिम्पियातील मैदानापासून ही ज्योत निघेल. ग्रीसचा ११ दिवसांचा ५ हजार किलोमीटरचा प्रवास करून २६ एप्रिल रोजी अथेन्स येथे ती पॅरिस ऑलिम्पिकच्या संयोजन समिती अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी या वेळी ऑलिम्पिकच्या शांतता आणि एकात्मतेच्या भावनेची ओळख करून देताना जगात शांतता नांदावी यासाठी ही स्पर्धा प्रेरक ठरेल अशी आशा व्यक्त केली. बाख म्हणाले, ‘‘हा ज्योत प्रज्वलन सोहळा म्हणजे भूतकाळातील आठवणींना उजाळा देणारा आणि उजळून निघणाऱ्या भविष्याच्या विश्वासाचे प्रतीक आहे. सध्या जगात युद्ध आणि संघर्षांच्या भावना वाढत आहेत. लोक द्वेष, आक्रमकता आणि नकारात्मक बातम्यांना कंटाळले आहेत. अशा वेळी आम्हाला एकत्र ठेवणाऱ्या प्रसंगाची आम्ही वाट पाहत आहोत. ही संधी आम्हाला या ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने मिळत आहे. सर्व जगाने द्वेष आणि सूड भावना विसरून एकत्र यावे हीच आमची इच्छा आहे आणि हाच संदेश ऑलिम्पिक देते.’’