Paris Olympic 2024 Bronze Medal Winner Sarabjot Singh Rejected Government Job: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज ११ ऑगस्ट हा अखेरचा दिवस आहे. भारताचे सर्व सामने, खेळ संपले असून भारताने ६ ऑलिम्पिक पदकांसह आपली मोहिम पूर्ण केली आहे. नेमबाजी, हॉकी, कुस्ती आणि ॲथलेटिक्स या क्रीडा स्पर्धांमध्ये ही पदकं मिळाली आहेत. भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंचे खूप कौतुक होत असून राज्य सरकारकडून त्यांचा गौरवही करण्यात येत आहे. दरम्यान, एका पदक विजेत्या खेळाडूने राज्य सरकारने दिलेली नोकरी करण्यास नकार दिला आहे. यामागचे कारणही या खेळाडूने सांगितले आहे.
भारताला नेमबाजीत मनू भाकेरसोबत दुसरं पदक मिळवून देणाऱ्या सरबज्योत सिंगने सरकारी नोकरी नाकारली आहे, याचं कारण ऐकूनही सर्व त्याच्या निर्णयाची दाद देतील. सरबज्योत हा हरियाणातील अंबाला येथील धीन गावचा रहिवासी आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील १० मीटर एअर पिस्तूल सांघिक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकेरसह सरबज्योत सिंगने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत सरबज्योत सिंग आणि मनू भाकेर या जोडीने ओ ये जिन आणि वोंहो ली या कोरियन जोडीचा १६-१० अशा फरकाने पराभव करून पदक जिंकले.
Paris Olympics 2024 मध्ये पदक जिंकून भारताचा गौरव करणाऱ्या सरबज्योत सिंगला हरियाणा आणि पंजाब सरकारने क्रीडा विभागात उपसंचालक पदाची ऑफर दिली आहे. यासोबतच त्याला हरियाणा सरकारने २.५० कोटी रुपयांचे रोख बक्षीसही देऊ केले आहे. हरियाणाचे क्रीडा मंत्री संजय सिंह यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.
सरबज्योत सिंगने का नाकारली सरकारी नोकरी
२२ वर्षीय सरबज्योत सिंगने हरियाणा आणि पंजाब सरकारने ऑफर केलेल्या नोकऱ्या नाकारल्या आहेत. यामागचे कारण सांगताना सरबज्योत सिंग म्हणाला, ‘नोकरी चांगलीच आहे, पण मी आता करणार नाही. मला आधी माझ्या शूटिंगवर काम करायचे आहे. माझे कुटुंबीयही मला एखादी चांगली नोकरी करण्यास सांगत आहेत, पण मला शूटिंगवर लक्ष द्यायचे आहे. मला माझ्या काही निर्णयांच्या विरोधात जायचे नाही, त्यामुळे मी सध्या हे काम करू शकत नाही.’
सरबज्योत सिंग गुरुवारी भारतात परतला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते नवी दिल्लीतही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सरबज्योत सिंगला युवा आणि क्रीडा मंत्रालयाने २२.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सरबज्योत सिंगला फोन करून पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले होते.
#WATCH | Ambala, Haryana: On Haryana government's offer of the post of Deputy Director in the Sports Department, Indian Shooter and Olympic Athlete Sarabjot Singh says, "The job is good but I will not do it right now. I want to work on my shooting first. My family has also been… pic.twitter.com/XU7d1QdYBj
— ANI (@ANI) August 10, 2024
सरबज्योत सिंग हा शेतकरी जतिंदर सिंग आणि हरदीप कौर यांचा मुलगा आहे. त्याने चंदिगडमधून शिक्षण पूर्ण केले आहे. याआधी सरबज्योत सिंगने २०१९ मध्ये ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वेळी, सरबज्योत सिंग २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघाचा भाग होता आणि सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय सरबज्योत सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे.