Paris Olympic 2024 Medals: ऑलिम्पिक २०२४ चे आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या नजरा पदकं जिंकण्याकडे असतील. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्य पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू यावेळी पदकांचा दुहेरी आकडा गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती, ही भारताची ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण यंदाचे हे ऑलिम्पिक मेडल (Paris Olympic 2024) खासप्रकारे तयार केले आहेत.
ऑलिम्पिक पदकांचाही इतिहास आहे. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पहिल्यांदा १९०४ सेंट लुईस गेम्समध्ये वापरली गेली होती आणि तेव्हापासून पदके देण्याची ही परंपरा सुरू झाली. या पदकांचा आकार, वजन आणि रचनेत वेळोवेळी बदल झाले आहेत. ऑलिम्पिकचे आयोजन करणारे देशही त्यांच्या पद्धतीने पदके तयार करतात.
Olympic पदकांचा इतिहास
ऑलिम्पिक पदकांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे यावेळी पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारी पदके एका विशेष धातूपासून बनवली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्ही पदके षटकोनी आकारात आहेत आणि त्यामध्ये आयफेल टॉवरच्या मूळ लोखंडी धातूचा एक तुकडा बसवला आहे. ज्या धातूचे कुकडे या पदकांवर बसवण्यात आले आहेत, हे धातूचे तुकडे आयफेल टॉवरच्या नूतनीकरण दरम्यान काढण्यात आले होते. प्रत्येक तुकडा त्याच्या मूळ रंगात तयार करून पदकाच्या मध्यभागी बसविला गेला आहे.
हेही वाचा – Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या
LVMH ज्वेलरी हाऊस, चौमेट यांनी या पदकाची रचना केली आहे. पदकाचा आकार षटकोनासारखा आहे कारण त्याचे सहा गुण फ्रान्सच्या नकाशाचे प्रतिनिधित्व करतात. ऑलिंपिकची सुवर्णपदके ही पूर्णपणे शुद्ध सोन्याने बनलेली नसतात. ही पदके प्रत्यक्षात ९२.५ टक्के चांदी आणि १.३४ टक्के सोन्याचे बनलेले आहेत. आयओएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक सुवर्णपदकामध्ये ६ ग्रॅम सोने असले पाहिजे. पॅरिसमधील प्रत्येक सुवर्णपदकाचे वजन ५२९ ग्रॅम असेल.
ऑलिम्पिकनुसार पदकांच्या रिबन्सही बदलताना दिसतात. ऑलिम्पिक २०२४ साठी पदकांच्या रिबन गडद निळ्या रंगाच्या असतील आणि आयफेल टॉवरसारख्या जाळीची नक्षी यावर असेल. पॅरालिम्पिक पदकांच्या रिबनचा रंग गडद लाल असेल. ही पदके ८५ मिमी रुंद आणि ९.२ मिमी जाडीची आहेत. पॅरिस टकसाळ या ५,०८४ पदकांची निर्मिती करत आहे. त्यापैकी सुमारे २,६०० ऑलिम्पिकसाठी आणि २,४०० पॅरालिम्पिकसाठी आहेत. तर या स्पर्धेत एकूण १०,५०० खेळाडू सहभागी होतील, असा अंदाज आहे. २६ जुलैला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा असेल पण खरंतर सामन्यांना २४ जुलैपासून सुरूवात होणार आहे. तर ११ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा सुरू असेल.