Swapnil Kusale Gets Double Promotion in Railways After Olympic Win: स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) कांस्यपदक जिंकत भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. स्वप्नीले पुरूषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये ४५१.४ स्कोअर करत तिसरे स्थान पटकावले. स्वप्नीलच्या या विजयानंतर रेल्वेने त्याला बढती दिली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला स्वप्नील २०१५ मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ‘कमर्शियल कम तिकीट क्लर्क’ म्हणून भारतीय रेल्वेत रुजू झाला.
स्वप्नील २०१५ पासून मध्य रेल्वेत काम करत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील कांबळवाडी गावातील २८ वर्षीय स्वप्नील २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत आहे, परंतु पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला आणखी १२ वर्षे वाट पाहावी लागली. गुरुवारी निवेदन जारी केल्यानंतर आता भारतीय नेमबाजाला डबल प्रमोशन मिळाल्याचे नक्की झाले आहे. स्वप्नील हा तिकिट क्लार्कवरून आता OSD अधिकारी झाला आहे.
स्वप्नीलने कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्याच्या प्रमोशनबद्दल भाष्य केले होते. स्वप्नीलच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, ‘तो त्याच्या कार्यालयाच्या वागण्यामुळे खूप निराश झाला होता. गेल्या नऊ वर्षांपासून तो रेल्वेमध्ये काम करत आहे, मात्र प्रमोशनसाठी त्याचा कधीही विचार करण्यात आला नाही.
हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीयांसाठी मोठी घोषणा, दिग्गज उद्योगपती देणार अलिशान…
Paris Olympics 2024: स्वप्नील कुसाळेला रेल्वेकडून डबल प्रमोशन
मध्य रेल्वेने (Central Railways) प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेल्वेने सांगितले की, कुसाळेने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. या कामगिरीमुळे भारताच्या पदकतालिकेतच भर पडली नाही, तर स्वप्नील भारतीय नेमबाजी खेळातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याचे यश अनेक वर्षांच्या समर्पण आणि प्रशिक्षणानंतर मिळाले आहे, ज्यामुळे तो देशातील महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी एक आदर्श बनला आहे. स्वप्नील कुसाळेच्या या कामगिरीचा भारतीय रेल्वेला खूप अभिमान आहे आणि या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. त्यांचे समर्पण आणि कठोर परिश्रम यामुळे भारतीय रेल्वे आणि देशाला मोठा सन्मान मिळाला आहे.
२०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, स्वप्नील कुसाळेचे वडील आणि प्रशिक्षक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्याला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्र सरकार स्वप्नील कुसाळे यांना एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. ऑलिम्पिकमधून परतल्यावर त्याचे स्वागत केले जाईल.”