Vinesh Phogat Disqualify Due to Overweight in Paris Olympics 2024: ‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.
हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, भारताला सर्वात मोठा धक्का
अतिरिक्त वजनामुळे विनेश फोगट अपात्र; कोणाला मिळणार पदक?
भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. मंगळवारी झालेल्या लढतींपूर्वी तिचं वजन नियमानुसार होतं. मात्र बुधवारी सकाळी झालेल्या वजन चाचणीत तिचं वजन अतिरिक्त असल्याचं स्पष्ट झालं. भारतीय ऑलिम्पिक समितीने यासंदर्भात पत्रक जारी करुन माहिती दिली.
बुधवारी रात्री सुवर्णपदकासाठी विनेशचा अमेरिकेच्या सारा अन हिल्डरब्रँट मुकाबला होणार होता. मात्र अपात्र ठरवण्यात आल्यामुळे विनेशला रौप्यपदक मिळणार नाही. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियमांनुसार, कुस्तीपटू वजन चाचणीत अपात्र ठरला किंवा या चाचणीला उपस्थित राहू शकला नाही तर त्याला अपात्र ठरवण्यात येतं. त्याला कोणतंही मानांकन/श्रेणी मिळत नाही.
ह
२९वर्षीय विनेश ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. विनेशसह साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी वर्षभरापूर्वी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत आंदोलन केलं होतं. ४० दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान विनेशसह साक्षी आणि बजरंग यांना दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर पकडून ओढत ताब्यात घेतलं होतं. यानंतर एसीएल दुखापतीमुळे विनेश ऑलिम्पिकमध्ये खेळणार का? याविषयी साशंकता होती. अंतिम पंघाल ५३ किलो वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. विनेशने ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेत ५० तसंच ५३ किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला. ५० किलो वजनी गटातून ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती.
पदक कोणाला मिळणार?
विनेश अपात्र ठरल्यामुळे बुधवारी रात्री होणारा सुवर्णपदकाचा मुकाबला होणार नाही. विनेशची प्रतिस्पर्धी सारा अॅन हिल्डरब्रँटला सुवर्णपदक देण्यात येईल. ही लढतच होणार नसल्यामुळे रौप्यपदक कोणालाच देण्यात येणार नाही.
बुधवारीच कांस्यपदकासाठी बुधवारीच लढत होणार आहे. सुसाकी आणि लिवाच यांच्यात रिपीचेज लढत होणार आहे. डोडोयू आणि फेंग यांच्यात रिपीचेजची दुसरी लढत होणार आहे. या दोन लढतीत ज्या कुस्तीपटू विजेत्या ठरतील त्यांच्यात कांस्यपदकासाठी मुकाबला होईल.