Paris Olympics 2024 Pregnant Archer Aims 10 After Baby Kicks: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अनेक महिला खेळाडूही सहभागी आहेत. पण या महिला खेळाडूंमध्ये काही महिला या मातृत्त्वाच्या उंबरठ्यावर असताना खेळताना दिसल्या. इजिप्तची नादा हाफिज आणि अझरबैजानची यायागुल रमाझानोव्हा यांनी गरोदर असताना आपापल्या खेळात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेत खूपच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. अझरबैजानच्या तिरंदाज यायलागुलने शेअर केलेला हा किस्सा खूपच मजेशीर आहे. तिने सांगितले की जेव्हा ती तिरंदाजी सामन्यात नेम साधत होती, तेव्हा एकदा तिला वाटले की बाळाने लाथ मारली आहे आणि नंतर तिचा बाण अचूक १० अंकावर लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 10: भारताची कुस्तीपटू निशा दहियाचा शानदार विजय, क्वार्टर फायनलचा सामना खेळणार

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे अनेक खेळाडू आपल्या विजय-पराजयाच्या कहाणी इंस्टाग्रामवर शेअर करतात, पण गेल्या आठवड्यात तलवारबाजीमध्ये सहभागी झालेल्या इजिप्तच्या नादा हाफिझनेही सामन्यानंतर ती गरोदर असल्याचे सांगितले. सात महिन्यांची गरोदर असल्याचे नादाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले. मॅचदरम्यानचा फोटो शेअर करताना हाफिजने लिहिले होते की, ‘तुम्हाला स्टेजवर दोन खेळाडू दिसत आहेत पण प्रत्यक्षात तीन आहेत. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि माझं होणार बाळ.

या स्पर्धेत नादाने १६वे स्थान पटकावले, जी तिची तीन ऑलिम्पिक खेळांमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. याच्या एका दिवसानंतर अझरबैजानच्या तिरंदाजानेही ती साडेसहा महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा – Paris Olympics 2024: भारताच्या हॉकी संघाला सेमीफायनलपूर्वी मोठा धक्का, भारतीय खेळाडूला एका सामन्यासाठी केलं निलंबित

यायलागुल रमाझानोव्हाने सिन्हुआ न्यूजला सांगितले की बाण सोडण्यापूर्वी तिला तिच्या बाळाने पोटात लाथ मारल्याचे जाणवले आणि त्यानंतर तिने १० गुणांसाठी अचूक नेम टिपला. यापूर्वीही गर्भवती महिला ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्या आहेत. ऑलिम्पिक व्यतिरिक्त, अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने गरोदर असूनही २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेतला होता आणि विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती.

ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी रमाझानोव्हा अझरबैजानच्या इतिहासातील फक्त दुसरी तिरंदाज आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ओल्गा सेन्युक ही कामगिरी करणारी त्या देशातील पहिली तिरंदाज होती. पॅरिसमधील महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत रमाझानोव्हाने भाग घेतला. तिने राऊंड ऑफ ३२च्या एलिमिनेशन राऊंडमध्ये २८ क्रमांकाच्या चिनी तिरंदाज एन किक्सुआन विरुद्ध मोठा अपसेट खेचला. अझरबैजानच्या तिरंदाजला नंतर जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनविरूद्ध राऊंड ऑफ १६ फेरीतून पराभवासह बाहेर जावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympics 2024 azerbaijani archer competes at olympics while 6 months pregnant aims at 10 after baby kicks bdg