नवी दिल्ली : तारांकित बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची आगामी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच वेळी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारा नेमबाज गगन नारंग यंदा भारताचा पथकप्रमुख असेल.
‘‘गगन नारंग यापूर्वी भारतीय पथकाचा उपप्रमुख होता. मात्र, मेरी कोमने पथकप्रमुख म्हणून राजीनामा दिल्यानंतर हे स्थान रिक्त आहे. त्यामुळे आता नारंगची पथकप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे,’’ असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी सांगितले. ‘‘भारतीय पथकाचे नेतृत्व एका ऑलिम्पिक पदकविजेत्यानेच करावे अशी माझी इच्छा होती. मेरीच्या माघारीनंतर ऑलिम्पिक संघटनेतील माझे युवा सहकारी नारंग हे पथकप्रमुखाच्या पदासाठी योग्य उमेदवार होते,’’ असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात उषा यांनी म्हटले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगलीच कामगिरी करतील असा विश्वासही या वेळी उषा यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज; आक्रमक स्पेनची फ्रान्सशी गाठफुटबॉल महासत्तांत वर्चस्वाची लढत
सहा वेळची जगज्जेती बॉक्सिंगपटू मेरीने वैयक्तिक अडचणीमुळे आपल्यासमोर पद सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे कारण देत पथकप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.
उद्घाटन सोहळ्यासाठी पुरुष ध्वजवाहक म्हणून यापूर्वीच टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमलचे नाव जाहीर करण्यात आले आहे. महिला खेळाडूची निवड शिल्लक होती. याची पूर्तताही करताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने महिला ध्वजवाहक म्हणून सिंधूची निवड केली. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेच (आयओसी) ‘टोक्यो २०२०’ ऑलिम्पिकपासून जुनी परंपरा खंडीत करताना उद्घाटन सोहळ्यात पुरुष आणि महिला खेळाडू असे दोन ध्वजवाहक राहतील असा नियम केला होता. त्यावेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम आणि हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे भारताचे ध्वजवाहक होते.