Six Indian wrestlers have been selected for the Paris Olympics 2024 : ज्या खेळांमध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक यश मिळाले आहे, त्यात कुस्तीचाही समावेश आहे. भारताने कुस्तीमध्ये सात पदके जिंकली आहेत. गेल्या चार ऑलिम्पिकमध्ये भारताने या खेळात पदके जिंकली आहेत. त्यामुळेच यावेळीही कुस्तीपटूंकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. भारतीय कुस्तीमध्ये गेल्या वर्षभरात अनेक वाद निर्माण झाले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात देशातील अव्वल कुस्तीपटू धरणे धरत बसले होते. निवड चाचणीबाबतही अनेक वाद झाले. एवढे करूनही भारताला सहा कोटा गाठण्यात यश आले. या सहा खेळाडूंवर भारत सरकारने किती पैस खर्च केले आहेत? जाणून घेऊया.
कुस्तीपटूंसाठी किती रुपये खर्च करण्यात आले आहेत?
पॅरिस ऑलिम्पिकसाठी कुस्तीसाठी एकूण ३७.८० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तीन वर्षांत १९ राष्ट्रीय शिबिरांसह ६६ परदेश दौरेही आयोजित केले आहेत. या सायकलमध्ये १० अव्वल खेळाडू आणि १५ डेवलेपमेंट रेसलर्सचा समावेश होता.
यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातील सहा कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये पाच महिला कुस्तीपटू व एक पुरुष कुस्तीपटू सहभागी होणार आहे. भारतातील पाच महिला कुस्तीपटू देशाचे प्रतिनिधित्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवडले भारताचे सहा कुस्तीपटू –
अमन सेहरावत: पुरुष फ्रीस्टाइल, ५७ किलो
विनेश फोगट : महिला ५० किलो
अंशू मलिक : महिला ५७ किलो
निशा दहिया : महिला ६८ किलो
रितिका हुडा : महिला ७६ किलो
अंतिम पंघाल: महिला ५३ किलो
दोन खेळाडूंना मिळाले आहे सीड –
यावेळी कुस्तीपटूंना ऑलिम्पिक स्पर्धेतही सीडिंग देण्यात आले आहे. सीडेड खेळाडू प्राथमिक फेरीत एकमेकांसमोर येणार नाहीत. भारताकडून अंतिम पंघाल आणि अमन सेहरावत यांना सीड देण्यात आले आहे. सीडमुळे पंघालला चांगला ड्रॉ मिळाला आहे. तिला प्राथमिक फेरीत तिच्या श्रेणीतील अव्वल कुस्तीपटूंचा सामना करावा लागणार नाही. तर अंशू, निशा दहिया, रितिका हुडा आणि विनेश फोगट यांना सीडिंग दिलेले नाही.
विनेश फोगाट
२९ वर्षीय विनेश फोगाटचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. यावेळी ती ५० किलो वजनी गटात आव्हान देईल. विनेशच्या प्रशिक्षणावर आतापर्यंत ७०.४५ लाख रुपये खर्च झाले आहेत. हा पैसा त्यांचे परदेशी प्रशिक्षक, परदेशात प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग यासाठी खर्च करण्यात आला आहे. विनेश गेल्या वर्षी आशियाई गेम्समध्ये खेळू शकली नव्हती. शस्त्रक्रियेनंतर तिने यावर्षी पुनरागमन केले असून आता ती ऑलिम्पिकला जाणार आहे.
अंतिम पंघाल
१९ वर्षीय अंतिम पंघालवर भारत सरकारने ६६.५५ लाख रुपये खर्च केले आहेत. अंतिम ५३ किलो वजनी गटात आव्हान सादर करेल. ती शेवटची अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियन आहे. तिने सीनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकही जिंकले आहे.
अमन सेहरावत
भारताचा २० वर्षीय तरुण कुस्तीपटू अमन सेहरावतवर सरकारने ५६.५० लाख रुपये खर्च केले आहेत. अमन ५७ किलो वजनी गटात सहभागी होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने या प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. गतवर्षी सिनियर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवण्यातही तो यशस्वी ठरला होता.