Paris Olympics What PM Modi says about Vinesh Phogat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय चमूबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी (१५ ऑगस्ट) संवाद साधला. आज (दि. १६ ऑगस्ट) या संवादाचे प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब वाहिनीवर करण्यात आले. “पॅरिसला गेलेला प्रत्येक खेळाडू हा ‘चॅम्पियन’ आहे. भारत सरकार खेळांना समर्थन देत राहील आणि उच्च दर्जाची क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण होईल, हे सुनिश्चित करेल”, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तसेच खेळाडूंशी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदींनी कुस्तीपटू विनेश फोगटचाही उल्लेख केला.
खेलो इंडिया मोहिमेला यश
“हे ऑलिम्पिक भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने अनेक विक्रिम प्रस्थापित केले. पॅरिस ऑलिम्पिक हे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाँचिंग पॅड ठरले आहे. यानंतर क्रीडा क्षेत्र एक मोठे उड्डाण घेईल. आम्ही ‘खेलो इंडिया’ मोहीम सुरू केली. देशाच्या ग्रामीण भागातून चांगल्या खेळाडूंना हेरून त्यांना योग्य मंच देण्याचे काम या मोहिमेतून झाले. मला सांगायला आनंद होतो आहे की, खेलो इंडिया मोहिमेतून पुढे आलेले २७ खेळाडू यावर्षी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते”, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
विनेश फोगट ही पहिली भारतीय कुस्तीपटू…
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “पॅरिस ऑलिम्पिक भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. ऑलिम्पिकच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात मनू भाकेर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरली. वैयक्तिक खेळात सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू ठरला. हॉकी संघाने ५२ वर्षांनंतर लागोपाठ दोन पदक जिंकले. अमनने केवळ २१ वर्षांच्या वयात पदक जिंकून देशाला गौरव प्राप्त करून दिला. विनेश फोगट ही महिला कुस्तीच्या अंतिम फेरीत जाणारी पहिली कुस्तीपटू ठरली.”
“खेलो इंडिया मोहिमेला आणखी बळकटी आगामी काळात दिली जाईल. यातून अनेक नवे खेळाडू देशाला मिळतील. आमच्या खेळाडूंना सुविधा आणि संसाधनाची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही क्रीडा विभागासाठी निधीची तरतूदही वाढवत आहोत. ऑलिम्पिकच्या आधी खेळाडूंना इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव देण्यात आला आहे. यापूर्वी क्रीडा क्षेत्राकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. खेळाडू आपल्या मेहनतीवर पदक जिंकून आणत होते. आता खेळाडूंना प्रशिक्षण आणि इतर सुविधा देण्यात आम्ही पुढाकार घेतला आहे”, असे सांगून पंतप्रधान मोदींनी आधीच्या सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.
आमच्या मुलींनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा श्रीगणेशा केला आहे. अंकिता, मनिका बत्रा, श्रीजा अकुला यांनीही उत्तम खेळ केला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
२०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारत आग्रही
भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद सांभाळण्यास तयार आहे. लाल किल्ल्यावरूनही मी याची घोषणा केली आहे. यासाठी ऑलिम्पिक खेळलेल्या जुन्या-जाणत्या खेळाडूंचाही अनुभव आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे की, तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जे काही बारीक-सारीक गोष्टींचे निरीक्षण केले आहे, त्याची माहिती आम्हाला द्या. त्यानुसार सरकार एक उत्तम ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करू शकेल, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
खेळाडूंना दिली ‘ही’ जबाबदारी
खेळाडूंना संबोधित करताना पंतप्रधान मोदींना सर्वांना एक जबाबदारी दिली. ते म्हणाले, टोक्यो ऑलिम्पिकनंतरही जेव्हा खेळाडू मला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांना मी शाळांमध्ये जाऊन क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण करण्यास सांगितले होते. यावेळीही तुम्हाला एक मोहीम देत आहे. भारताने ‘एक वृक्ष आईसाठी’ मोहीम सुरू केली आहे. खेळाडूंनी या मोहिमेत सहभागी होऊन आईसाठी वृक्ष लावावे. तसेच आपापल्या गावात जाऊन शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीसाठी उद्युक्त केले पाहीजे. यातून देशाला लाभ होईल, याची मला खात्री आहे.