PM Narendra Modi Meets India Contingent of Paris Olympics 2024 Video: नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या काही खेळाडूंनी इतिहास घडवला तर काहींच्या पदरी निराशा पडली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ११७ खेळाडूंनी भाग घेतला होता. यावेळी भारताने एक रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण ६ पदकं जिंकली आहेत. तर चौथ्या क्रमांकावर राहिल्याने भारताला एकूण ७ पदकं गमवावी लागली. यसह बॅडमिंटनमध्ये यंदा भारताला एकही पदकं मिळवता आलं नाही. दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम हॉकी संघाची भेट घेतली. भारताच्या हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश याचा भारतीय हॉकी संघासाठी हा अखेरचा सामना होता. भारताने गट सामन्यात चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली, पण संघाला अंतिम सामना गाठता आला नाही. अंतिम सामना गाठला नसला तरी भारताचा हॉकी संघ पदक घेऊनच मायदेशी परतला. भारतीय हॉकी संघाचा महान गोलरक्षक पीआर श्रीजेश याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघाची जर्सी भेट दिली. याशिवाय पंतप्रधान मोदींनी प्रत्येक खेळाडूची पदकं पाहिली. तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपली हॉकी स्टीक पंतप्रधानांना भेट म्हणून दिली.
पंतप्रधान मोदींनी अमन सेहरावत आणि स्वप्नील कुसाळे यांचीही भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकरने पंतप्रधान मोदींना तिची पिस्तूल दाखवली. पंतप्रधानांनी लक्ष्य सेन याच्याशीही बराच वेळ चर्चा केली. लक्ष्यने आघाडी घेतल्यानंतर त्याच्या दुखापतीमुळेही कांस्यपदक गमावले. कुस्तीपटू अमन सेहरावतने आपली जर्सी पंतप्रधान मोदींना भेट दिली आहे. अमन सेहरावत हा २१व्या वर्षी ऑलिम्पिक पदकं जिंकणारा भारताचा सर्वात तरूण खेळाडू ठरला. मोदींनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पण सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना संबोधित करत त्यांच्यांशी चर्चा केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले अनेक खेळाडू अजूनही भारतात परतलेले नाहीत. नीरज चोप्रा त्याच्या दुखापतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जर्मनीत आहे. तर विनेश फोगट १७ ऑगस्टला भारतात परतणार आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूही पंतप्रधान मोदींना भेटू शकली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूला यावेळी निराशेचा सामना करावा लागला. राऊंड ऑफ-१६ च्या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला.
© IE Online Media Services (P) Ltd