Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेनला मलेशियाच्या ली झी झियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ७१ मिनिटे रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत लक्ष्य सेनला २१-१३, १६-२१, ११-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. यासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची बॅडमिंटन मोहीम पदकाविना संपुष्टात आली. लक्ष्य सेनच्या पराभवानंतर भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी ऑलिम्पिकमधील भारतीय बॅडमिंटनपटूंच्या निराशाजनक मोहिमेबद्दल सांगितले.
लक्ष्य सेनच्या पराभवाववर काय म्हणाले कोच प्रकाश पदुकोण?
लक्ष्य सेन विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना प्रकाश पदुकोण म्हणाले, “लक्ष्य सेन चांगला खेळला आहे. मात्र त्याच्या पराभवाने मी निराश झालो आहे. रविवारीही तो जिंकू शकला नव्हता. कांस्यपदकाच्या सामन्यातही त्याने पहिला गेम जिंकला आणि विजय मिळवला. दुसरा गेममध्येही तो ७-३ ने आघाडीवर होता.” पदुकोण पुढे म्हणाले, “लक्ष्यला वारा असताना खेळण्यात अडचण येत होती. बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंना वाऱ्याविरुद्ध खेळणे सामान्यतः अधिक सोयीचे असते. दुसऱ्या गेममध्ये ८-३ अशी आघाडी घेतल्यानंतर, लक्ष्यने अजून २-३ गुण मिळवले असते तर सामन्याचा निकाल वेगळा असता…”
लक्ष्य सेनच्या सामन्याबद्दल प्रकाश पदुकोण म्हणाले, “लक्ष्यच्या मनात कुठेतरी वाऱ्याशी खेळण्याचा विचार हावी होत होता, ज्यामुळे विरोधी खेळाडूला आत्मविश्वास मिळाला. वारा असताना खेळणं यावर भारतीय खेळाडूंच्या अस्वस्थतेवर आम्हाला काम करावे लागेल.”
प्रकाश पदुकोण यांनी ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची मानसिकता विकसित करण्यावर भर दिला. प्रकाश पदुकोण म्हणाले, “बॅडमिंटनमध्ये एकही पदक न मिळाल्याने मी निराश झालो आहे. आम्ही बॅडमिंटनमध्ये तीन पदकांचे दावेदार होतो, आम्हाला एक जरी पदक मिळाले असते तर आम्हाला आनंद झाला असता. ऑलिम्पिकमधील खेळाडूंसाठी सरकार, SAI, क्रीडा मंत्रालय इत्यादींनी आपल्या बाजूने सर्व काही केले आहे. खेळाडूंची जी काही मागणी आणि पाठबळ हवं होतं, तेही पूर्ण केले. आता खेळाडूंनाही जबाबदारी घ्यावी लागेल.”
बॅडमिंटन प्रशिक्षक असलेले प्रकाश पदुकोण म्हणाले, “फक्त बॅडमिंटनच नाही, तर इतर खेळांमध्येही माईंड ट्रेनिंग महत्त्वाचे आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंवर खूप दडपण असते. भारतीय बॅडमिंटनपटू टेक्निक, फिटनेस यात परिपूर्ण होते. पण दबाव मात्र ते झेलू शकले नाहीत. त्यासाठी योगासने, ध्यान यासारख्या गोष्टींचा परिचय करून द्यावा लागेल. त्यामुळेच पदकासाठी फेव्हरेट नसतानाही मनू भाकेरने यावेळी बाजी मारली.”
प्रकाश पदुकोण पुढे म्हणाले, “गेल्या ऑलिम्पिकमध्येही आपण हेच पाहिले आहे, जो पदकासाठी फेव्हरेट नसतो तोच पदक जिंकतो. कारण त्याच्यावर मानसिक दडपण नसते. सध्या आमच्याकडे परदेशी प्रशिक्षकआणि फिजिओ आहेत. सर्व उपलब्ध आहे, परंतु आता आपल्याला पुढील ऑलिम्पिकसाठी तयारी करावी लागेल. माइंड ट्रेनिंग ही काही ऑलिम्पिकच्या तीन महिने आधी करावी लागत नाही.”