Sachin Tendulkar helped to Rai Benjamin father Winston : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या स्पर्धेचा समारोप झाला आहे. या स्पर्धेच्या पदकतालिकेत अमेरिका अव्वल असून भारत ७१व्या स्थानावर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन ॲथलीट राय बेंजामिनने दोन ऑलिम्पिक सुवर्णपदकं जिंकले. त्याने ४०० मीटर हर्डल्स आणि ४×४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. बेंजामिनचा क्रिकेट आणि वेस्ट इंडिजशी विशेष संबंध आहे. राय बेंजामिनचे वडील विन्स्टन बेंजामिन हे वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरकडे मदत मागितली होती. यांनतर सचिनने देखील त्यांची मदत केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राय बेंजामिनमुळे अमेरिकेचे राष्ट्रगीत पॅरिसमध्ये दोनदा वाजले –

अमेरिकन ॲथलीट रॉय बेंजामिनने पॅरिस ऑलिम्पिकच्या दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले. पहिले वैयक्तिक आणि दुसरे सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक आणि ४×४०० मीटर रिले शर्यतीत नवीन विक्रमासह दुसरे सुवर्णपदक जिंकले. राय बेंजामिनच्या या दोन पदकामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे राष्ट्रगीत दोनदा वाजले होते.

सचिन तेंडुलकरने विन्स्टन बेंजामिनला केली होती मदत –

राय बेंजामिन हा वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा आहे, ज्यांनी ८० आणि ९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते. विन्स्टन बेंजामिन हे अँटिग्वामध्येच क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. या कामासाठी त्यांनी २०२२ साली सचिन तेंडुलकरला मदतीचे आवाहनही केले होते. ही मदत आर्थिक नसून क्रिकेटशी संबंधित होती. विन्स्टन बेंजामिनने सचिनला क्रिकेटशी संबंधित गोष्टी देण्याची विनंती केली होती. यानंतर सचिन तेंडुलकरनेही विन्स्टन बेंजामिन यांची मदत केली. सचिनशिवाय भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीननेही बेंजामिनला मदत केली आहे.

हेही वाचा – Arshad Nadeem : ‘…हा देशाचा आणि अर्शदचा अपमान’, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू पीएम शाहबाज शरीफ यांच्यावर का संतापला? जाणून घ्या

विन्स्टन बेंजामिन यांचे भारताशी आहे घट्ट नाते –

सचिन तेंडुलकरकडून मदत मिळालेल्या विन्स्टन बेंजामिनचेही भारताशी घट्ट नाते आहे. त्यांच्या आठवणींमध्ये भारत राहतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण १९८७ साली त्याने दिल्लीत भारतीय भूमीवर कसोटी पदार्पण केले होते. याशिवाय, भारतीय भूमीवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली आहे.

हेही वाचा – Keshav Maharaj : केशव महाराजने केला मोठा पराक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा गोलंदाज

हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता, ज्यामध्ये बेंजामिन यांनी ५ विकेट्स घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिनच्या नावावर १०६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६१ विकेट्स आहेत. यामध्ये ८५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० विकेट घेतल्या असून २१ कसोटीत ६१ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris olympics 2024 winston benjamin helped by sachin tendulkar son rai 2 gold usa vbm