Paris Paralympics 2024, Navdeep Singh and Simran Sharma: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची जबरदस्त घोडदौड सुरूच आहे. ७ सप्टेंबर (शनिवारी) रोजी पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत (F41) भारताच्या नवदीप सिंहने सुवर्ण पदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचे सुवर्ण पदक हुकले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र नवदीपने पॅराऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम करून दाखविला आहे. खरंतर नवदीपला आधी रौप्य पदकाची घोषणा झाली होती. मात्र इराणचा खेळाडू अपात्र ठरल्यामुळे नवदीपच्या रौप्य पदकाला सुवर्णमध्ये बढती मिळाली. तसेच महिलांच्या २०० मीटर (T12) धावण्याच्या स्पर्धेत भारताची धावपटू सिमरन शर्माने कास्य पदकाची कमाई केली आहे.

या दोन पदकाच्या विजयानंतर आता भारताची पॅरिस पॅराऑलिम्पिकमधील पदकाची संख्या २९ वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत ७ सुवर्ण, ८ रौप्य आणि १४ कास्य पदक जिंकले आहे. पदक तालिकेत भारत सध्या १५ व्या स्थानावर आहे.

नवदीप सिंहे अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात ४७.३२ मीटर अंतरावर भाला फेकला. नवदीपच्या कारकिर्दीतील हा सर्वात उत्कृष्ट थ्रो होता. इराणच्या सादेघ सयाह बेत याने पाचव्या प्रयत्नात ४७.६४ मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्याला सुवर्णपदक दिल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र नंतर तो अपात्र असल्याचे आढळून आल्यामुळे नवदीप सिंहला रौप्यच्या जागी सुवर्ण पदक बहाल करण्यात आले.

दुसरीकडे महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत सिमरन शर्माने २४.७५ सेकंदात धाव पूर्ण केली. अंतिम फेरीत क्युबाच्या ओमारा इलियासे सुवर्ण (२३.६२ सेकंद), व्हेनेझुएलाच्या पाओला अलेक्झांड्राला रौप्य (२४.१९ सेकंद) तर भारताच्या सिमरनला कास्य पदक मिळाले.

Story img Loader