जिनेव्हा : लिओनेल मेसी, किलियन एम्बापे आणि नेमार या तारांकित खेळाडूंनी झळकावलेल्या गोलच्या जोरावर पॅरिस-सेंट जर्मेन संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मकाबी हैफा संघावर ३-१ असा विजय नोंदवला.
सामन्याच्या २४व्या मिनिटालाच मकाबीकडून त्जॅरोन चेरीने गोल मारत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर मेसीने (३७व्या मि.) गोल झळकावत पॅरिस-सेंट जर्मेनला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत बरोबरी ही कायम होती.
दुसऱ्या सत्रात पॅरिस-सेंट जर्मेनने आक्रमक खेळ करत मकाबीवर दबाव निर्माण केला. ६९व्या मिनिटाला मेसीच्या साहाय्याने एम्बापेने गोल करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अनुभवी नेमारने (८८व्या मि.) गोल झळकावत संघाला ३-१ अशा सुस्थितीत पोहोचवले.
रेयाल माद्रिदचा लेइपझिगवर विजय
दुसऱ्या सत्रात उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे रेयाल माद्रिदने लेइपझिगवर २-० अशी मात केली. सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र कोणाला गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात माद्रिदच्या फेडेरिको व्हाल्वेर्डे (८०व्या मिनिटाला) गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर भरपाई वेळेत मार्को असेन्सियोने गोल करीत संघाची आघाडी दुप्पट केली. अन्य लढतीत, युव्हेंट्सने बेन्फिकाकडून १-२ अशी हार पत्करली.