भारताचा युवा टेनिसपटू प्रकाश अमृतराज याचे एटीपी चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान बुधवारी दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात जपानच्या आठव्या मानांकित गो सोएडा याच्याकडून प्रकाशला ६-७, ६-३, ४-६ असे पराभूत व्हावे लागले.
या स्पर्धेतील पाचवा सामना (पात्रता फेरीतील तीन) खेळणाऱ्या अमृतराजने सोएडाला कडवी लढत दिली. अखेर २ तास २९ मिनिटांच्या झुंजीनंतर अमृतराजला हार पत्करावी लागली. पहिल्या सेटच्या सुरुवातीलाच आपली सव्‍‌र्हिस गमावल्यानंतर अमृतराजने जोमाने पुनरागमन केले. त्याने प्रतिस्पध्र्याच्या दोन वेळा सव्‍‌र्हिस भेदल्या आणि ५-३ अशी आघाडी घेतली. पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतर सोएडाने सहजपणे हा सेट आपल्या नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये अमृतराजने पुन्हा एकदा पुनरागमन करत जोरकस फटके लगावले. त्याने नेटवर सुरेख खेळ केला आणि परतीचे सुरेख फटके लगावले. तिसऱ्या आणि नवव्या गेममध्ये सोएडाची सव्‍‌र्हिस भेदून अमृतराजने ४३ मिनिटांत दुसरा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली.
तिसरा सेट अटीतटीचा झाला. पण सोएडाने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. एकदा सव्‍‌र्हिस गमावल्यानंतर पिछाडीवर पडलेल्या अमृतराजने आठव्या गेममध्ये सामन्यात पुनरागमन केले. पण अतिआक्रमकपणा अमृतराजला भोवला. महत्त्वाच्या क्षणी गुणांची कमाई करत सोएडाने सामन्यात बाजी मारली. अन्य सामन्यात, स्लोव्हाकियाच्या अल्जाझ बेडेने याने दुसऱ्या फेरीत नेदरलॅण्ड्सच्या रॉबिन हासेचा ७-५, ६-३ असा पराभव करून आगेकूच केली.

Story img Loader