महेंद्रिसिंह धोनीला भारतीय संघात स्थान मिळायच्या आधी पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक या दोन यष्टीरक्षकांनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. धोनीच्या आगमनानंतर कामगिरीत सातत्याचा अभाव म्हणून दोघांनाही संघाबाहेर जावं लागलं. पार्थिव पटेल २००३ साली भारतीय विश्वचषक संघाचा हिस्सा होता. याशिवाय काही कसोटी सामन्यांमध्येही पार्थिवने भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलंय. मात्र संघातली आपली जागा गमावल्यानंतरही पार्थिव पटेल स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत आपली छाप पाडतच होता. पण पार्थिव पटेलने काही दिवसांपूर्वी आपल्याबद्दलच एक गोष्ट सर्वांशी शेअर केली आहे. पार्थिव पटेलला ९ चं बोटं आहेत.

 

“मी सहा वर्षांचा असताना हा छोटासा अपघात घडला होता. माझ्या डाव्या हाताची करंगळी दरवाज्यात अडकली होती. या अपघातात माझं बोट तुटलं. कोणत्याही यष्टीरक्षकासाठी ही गोष्ट खरंच कठीण असते. मात्र आपण क्रिकेटचा सराव करत असताना, शेवटचं बोट आणि ग्लोव्ह टेपने चिकटवायचो. सरावात विघ्न येऊ नये यासाठी मी हा पर्याय शोधला होता. पण अशा परिस्थितीतही मी यशस्वीपणे भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करु शकलो याचा मला अभिमान आहे.” पार्थिव Cow Corner Chronicles या कार्यक्रमात बोलत होता.

काही वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात दौऱ्यातही पार्थिवला संधी मिळाली होती. प्रदीर्घ कालावधीनंतर मिळालेल्या संधीचं सोन करत पार्थिव पटेलने आश्वासक कामगिरी करुन दाखवली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. दरम्यान सध्या लॉकडाउन काळात जगभरातील क्रिकेट सामने बंद आहेत. खेळाडू या काळात आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत.

Story img Loader