लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या भारताच्या बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकवण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी तो तासन्तास सराव करत असून आगामी विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पध्रेत धक्कादायक निकाल नोंदविण्यासाठी तो सज्ज झाला आहे. १० ते १६ ऑगस्ट या कालावधीत इंडोनेशियातील जकार्ता येथे ही स्पर्धा होणार आहे.
कश्यपने जकार्ता येथेच झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पध्रेत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या चेन लाँग याचा पराभव करून खळबळ माजवली होती. मात्र, उपांत्य फेरीत त्याला थकव्यामुळे जपानच्या केंटो मोमोटाकडून पराभव पत्करावा लागला होता. मुंबईत ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो बोलत होता. तो म्हणाला, ‘‘चेनवरील विजयाने मला भरभरून आत्मविश्वास दिला. अव्वल दहा खेळाडूंच्या खेळण्याच्या शैलीत विविधता असते, याची जाण मला आहे. योग्य परिस्थितीत हातचा गेलेला सामना कसा पुन्हा मिळवायचा याचे ज्ञान आपल्याकडे हवे.’’
‘‘कामगिरीचा आलेख चढता ठेवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच विश्व अजिंक्यपद स्पध्रेपूर्वीची सात आठवडे मला कठोर मेहनत घ्यायची आहे. अव्वल स्थान गाठण्यासाठी मला प्रत्येक दिवशी सातत्याने सराव करणे आवश्यक आहे. सराव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,’’ असे कश्यप म्हणाला.

Story img Loader