चीन सुपर सीरिज स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या परुपल्ली कश्यपला उपांत्यपूर्व फेरीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. ३४ मिनिटांच्या लढतीत चीनच्या झेनमिंग वांगने कश्यपवर २१-१७, २१-७ अशी मात केली. वांगने नेटजवळून सुरेख खेळ करत भरपूर गुणांची कमाई केली. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रदीर्घ रॅलीजवर भर दिला. मात्र वांगने सातत्याने कश्यपची सव्‍‌र्हिस भेदत पहिल्या गेमवर कब्जा केला. पहिल्या गेम पॉइंटद्वारे वांगने आगेकूच केली. दुसऱ्या गेममध्येही कश्यपला आपल्या कामगिरीत सुधारणा करता आली नाही. वांगने याचा फायदा उठवत जोरदार मुसंडी मारली आणि दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. दुसऱ्या गेममधील २८ गुणांपैकी २१ मिळवत वांगने आपले वर्चस्व सिद्ध केले.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेती सायना नेहवालने दुखापतीच्या कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली होती. कश्यपचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे. कश्यप यानंतर हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेत खेळणार आहे.      

Story img Loader