भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र त्यानंतर दुखापती आणि सातत्याचा अभाव यामुळे कश्यपच्या कामगिरीत घसरण झाली होती. प्रीमिअर बॅडमिंटन लीग या नव्या कोऱ्या स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमनासाठी कश्यप सज्ज झाला आहे.
‘‘हैदराबाद संघाचा भाग झालो, याचा आनंद आहे. इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेत मी बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले होते. असंख्य रंजक लढतींसाठी मी आतुर आहे. कौशल्य सिद्ध करण्यासाठी मी सज्ज आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी दुखापतींनी मला सतावले. आता मी नियमित सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर परतण्यासाठी उत्तम सराव होईल,’’ असे कश्यपने सांगितले.
जागतिक क्रमवारीत कश्यप सध्या १५व्या स्थानी आहे. त्याबाबत विचारले असता कश्यप म्हणाला, ‘‘पुरुष गटात स्पर्धा अतिशय चुरशीची आहे. त्यामुळे क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावणे कठीण आहे. याआधी मी अव्वल दहामध्ये धडक मारली आहे. या टप्प्यात स्थिरावण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक असते. लवकरच मी पुन्हा अव्वल दहामध्ये असेन.’’
प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत सहकारी किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ली चोंग वेई, मार्किस किडो आणि कर्स्टन मॉगेन्सन या अव्वल खेळाडूंकडून शिकण्याची संधी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा