भारताचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू केनिची तागो याच्यावर मात करीत फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आश्चर्यजनक विजयाची नोंद केली. तथापि, सायना नेहवालने दुसरी फेरी गाठताना सहज विजय मिळवला. परंतु एच एस प्रणॉय आणि सौरभ वर्मा यांना पहिल्या फेरीचाच अडसर पार करण्यात अपयश आले आहे.
कश्यपने ३८ मिनिटांत तागोला २१-११, २१-१८ असे हरविले. कश्यपचे सहकारी एच.एस.प्रणय व सौरभ वर्मा यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. जपानच्या केन्तो मोमोता याने प्रणय याला २१-११, १५-२१, २२-२० असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. इंग्लंडच्या राजीव औसेफ याने सौरभचा २१-१०, २१-११ असा सहज पराभव केला.
पाचव्या मानांकित सायनाने फक्त ३७ मिनिटांत फ्रान्सच्या सशिना व्हिग्नेस वाराचा २१-१६, २१-९ असा पराभव केला. वाराविरुद्धची लढत सायनासाठी आव्हानात्मक ठरेल, असे म्हटले जात होते.
मिश्र दुहेरीत भारताची अश्विनी पोनप्पा हिने रशियाच्या व्लादिमीर इव्हानोवा हिच्या साथीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्यांनी जपानच्या किगो सोनोदा व शिझुको मात्सुओ यांच्यावर २१-१६, २१-१९ अशी मात केली.

Story img Loader