युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलचे नाव आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणारा तो जम्मू आणि काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना राष्ट्रीय निवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अन्य चार महत्त्वाच्या गोलंदाजांना विश्रांती दिली आहे.
हरारे आणि बुलावायो येथे २४ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची शुक्रवारी निवड करण्यात आली. २४ वर्षीय रसूलने आपल्या कामगिरीद्वारे लक्ष वेधून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवले.
तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. याचप्रमाणे सध्या धोनीच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजमधील तिरंगी क्रिकेट स्पध्रेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीकडेच या मालिकेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनेही पुन्हा भारतीय संघात स्थान निर्माण केले आहे. याचप्रमाणे आयपीएलच्या सहाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी बजावणारा हरयाणाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माला एकदिवसीय पदार्पणाची संधी चालून आली आहे.
कप्तान आणि यष्टीरक्षक धोनीसह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि ऑफ-स्पिनर आर. अश्विन यांना विश्रांती देण्यात आली. तथापि, सलामीवीर मुरली विजयला संघातून वगळण्यात आले आहे. राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड करताना अनुभवी गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, प्रवीण कुमार आणि युवराज सिंग यांचा विचार करण्यात आला नाही.
‘‘झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आम्ही युवा खेळाडूंना प्राधान्याने संधी दिली आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
भारतीय संघात सात विशेषज्ञ फलंदाज, तीन फिरकी गोलंदाज, चार वेगवान गोलंदाज आणि एक यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा भारताच्या सलामीची धुरा सांभाळतील, तर कोहली, पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायुडू व अजिंक्य रहाणे मधल्या फळीत फलंदाजी करतील.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अश्विनला विश्रांती दिल्यामुळे ऑफ-स्पिनर रसूल याला संधी मिळाली आहे. मागील हंगामापासून महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे जम्मू आणि काश्मीर संघाला मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रसूलची कारकीर्द घडत आहे.
इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी रसूलने भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ४५ धावांत ७ बळी घेत सर्वाचे लक्ष वेधले होते. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याला पुणे वॉरियर्सने करारबद्ध केले होते. आयपीएल खेळणारा तो जम्मू आणि काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.
‘‘स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली होती. त्या मेहनतीचे फळ मिळाले. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड समिती रविचंद्रन अश्विनला विश्रांती देईल, अशी अपेक्षा होती. आता भारतीय संघात समावेश झाल्याने मी खूप आनंदी आहे. देवाच्या कृपेमुळेच हे शक्य होऊ शकले.’’
परवेझ रसूल, भारताचा फिरकीपटू
काश्मीरचा परवेझ रसूल भारतीय संघात
युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलचे नाव आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणारा तो जम्मू आणि काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना राष्ट्रीय निवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अन्य चार महत्त्वाच्या गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. हरारे आणि बुलावायो येथे २४ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची शुक्रवारी निवड करण्यात आली. २४ वर्षीय रसूलने आपल्या कामगिरीद्वारे लक्ष वेधून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-07-2013 at 12:37 IST
TOPICSक्रिकेट न्यूजCricket Newsजम्मू-काश्मीरJammu Kashmirटीम इंडियाTeam Indiaरणजी ट्रॉफीRanji Trophy
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parveez rasool from alleged terror links to m s dhonis team india