स्टेपानेक- पॅव्हलासेकचा दणदणीत विजय

पेस-बोपण्णा सरळ सेट्समध्ये पराभूत
चेक प्रजासत्ताक २-१ आघाडीवर
डेव्हिस चषकाचा राजा अशी बिरुदावली पटकावलेल्या लिएण्डर पेसला सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत आपली जादू दाखवता आली नाही. लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा जोडीला अनपेक्षित आणि दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे दुसऱ्या दिवसअखेर चेक प्रजासत्ताकने २-१ अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या आणि अंतिम दिवशी भारतीय संघासमोर एकेरीच्या दोन्ही लढती जिंकत ऐतिहासिक विजय साकारण्याचे मोठे आव्हान आहे.
पहिल्यांदाच दुहेरीत एकत्र खेळणाऱ्या राडेक स्टेपानेक आणि अ‍ॅडम पॅव्हलासेक जोडीने सरळ सेट्समध्ये ७-५, ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. पेस-बोपण्णा आणि स्टेपानेक या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असताना २० वर्षीय अ‍ॅडमने अचूक खेळासह सामन्याचे पारडे फिरवले. विस्मयचकित करणाऱ्या कामगिरीपेक्षा मूलभूत गोष्टी घोटीव करून आलेल्या अ‍ॅडमने कमीत कमी चुकांसह चेक प्रजासत्ताकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
डेव्हिस चषकात हमखास विजयाचे आशास्थान असलेल्या लिएण्डर पेसच्या कारकिर्दीतील डेव्हिस चषकातला गेल्या १५ वर्षांतला हा केवळ दुसरा पराभव आहे. योगायोग म्हणजे या जोडीला २०१२ मध्ये उझबेकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. घरच्या मैदानावर पराभूत होण्याची २००० नंतरची पेसची ही पहिलीच वेळ आहे. २००० साली लखनौ येथे झालेल्या डेव्हिस चषकाच्या लढतीत लेबॅनॉनविरुद्ध पेस आणि अली हमदेह जोडी पराभूत झाली होती. ४२व्या वर्षीय पेसने काही दिवसांपूर्वीच मार्टिना हिंगिसच्या साथीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. पेसच्या समावेशाने भारतीय संघाचा किमान एक विजय पक्का होईल असे चित्र होते. प्रत्यक्षात पेस- बोपण्णा जोडी पराभूत झाल्याने चेक प्रजासत्ताकला नमवत जागतिक गटात धडक मारण्याचे भारताचे स्वप्न धुसर झाले आहे.
तिन्ही सेट्समध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा सव्‍‌र्हिस गमावली. या आघाडीचा चेक प्रजासत्ताकने पुरेपूर फायदा उठवला. स्टेपानेक-अ‍ॅडम जोडीने पेसची सव्‍‌र्हिस चार तर बोपण्णाची तीनवेळा भेदण्यात यश मिळवले. पेसला याचि देहा याचि डोळा पाहण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांना पहिल्या सेटमध्ये बॉडीलाइन स्मॅशद्वारे त्याच्या अद्भुत कौशल्याची प्रचीती पाहायला मिळाली. मात्र जोडी म्हणून कामगिरी खालावल्याने स्टेपानेक-अ‍ॅडम जोडीने पहिला सेट ७-५ असा नावावर केला. ४-५ अशा पिछाडीतून पेस-बोपण्णाने ५-५ अशी बरोबरी केली. मात्र त्यानंतर स्टेपानेक-अ‍ॅडम जोडीने उर्वरित दोन गुणांसह सरशी साधली. दुसऱ्या सेटमध्ये स्टेपानेक-अ‍ॅडमने ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावर त्यांनी दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये स्टेपानेक-अ‍ॅडम जोडीने ४-२ अशी आघाडी घेतली. पाचव्या गेमदरम्यान रिव्ह्यू घेण्याचा चेकचा निर्णय अचूक ठरला. आघाडी वाढवत स्टेपानेक-अ‍ॅडम जोडीने विजय साकारला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

चेकसारख्या अव्वल संघाविरुद्ध खेळताना लय गवसणे आवश्यक असते. आम्ही जिंकणे अपेक्षित होते. मात्र आमच्या चौघांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या अ‍ॅडमने अफलातून खेळ करत सामन्याचे पारडे फिरवले. एकत्र सरावाला वेळ मिळाला नाही, असे कोणतेही कारण देणार नाही. स्टेपानेक-अ‍ॅडम पहिल्यांदाच एकत्र खेळत होते. रोहन आणि मी एकमेकांचा खेळ जाणतो. लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही यामुळे निराश आहोत. पराभवाची जबाबदारी दोघांचीही आहे.
– लिएण्डर पेस

’दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या दिवशीच्या स्वागत समारंभाला उपस्थित होते. त्यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या. मात्र भारतीय जनता पक्षाचे यशवंत सिन्हा आणि एस.एम. कृष्णा आजीवन अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (आयटा) गडावरून पाच मिनिटांत त्यांनी काढता पाय घेतला.
’ पेस – बोपण्णा यांना समर्थन देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचे खेळाडू उपस्थित होते. हॉकी इंडिया लीग स्पर्धेच्या लिलावाच्या निमित्ताने हॉकीपटूंचा दिल्लीत मुक्काम आहे. फावल्या वेळेचा सदुपयोग करत त्यांनी टेनिस मैफलीचा आनंद घेतला.
’पेस या नावातली जादू आर. के. खन्ना स्टेडियममध्ये अनुभवायला मिळाली. शुक्रवारी जेमतेम शंभरी गाठलेल्या प्रेक्षकसंख्येने शनिवारी पूर्ण क्षमतेपर्यंत मजल मारली. पेसच्या प्रत्येक फटक्याला जल्लोषी आवाजाने साथ देत चाहत्यांनी जोडीचा हुरुप वाढवला. लागोपाठ दोन सेट गमावल्यानंतर पुढचे चित्र स्पष्ट झाल्याने बहुतांशी जणांनी काढता पाय घेतला.

पेस-बोपण्णासारख्या मातब्बर जोडीला नमवल्याचे समाधान आहे. मला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. राडेकने उपयुक्त सूचना केल्या. अतिउष्ण आणि आद्र्रतापूर्ण वातावरणात खेळणे परीक्षाच आहे. पेस-बोपण्णा आणि राडेक यांची चर्चा असल्याने माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते आणि याचाच मी फायदा उठवला.
-अ‍ॅडम पॅव्हलासेक

Story img Loader