IND vs AUS Pat Cummins World Record: पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा पराभव करत १० वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. या मालिकेत पॅट कमिन्स एक वेगवान गोलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत संघाचे नेतृत्त्वही चांगले केले. कमिन्स या मालिकेत बुमराहनंतर सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. कमिन्सने या मालिकेत २५ विकेट घेतले आहेत. पॅट कमिन्सने सिडनी कसोटीत ३ विकेट्स घेत मोठा विक्रम केला आहे.
पॅट कमिन्सने भारताच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाद केले आणि अशा प्रकारे डब्ल्यूटीसीच्या इतिहासात त्याच्या २०० विकेट्स पूर्ण केले. WTC च्या इतिहासात २०० विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. कमिन्सने ४७व्या कसोटी सामन्यातील ८८ डावांमध्ये हा मोठा टप्पा गाठला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात नॅथन लायन हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि तो पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यावर २०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतो.
हेही वाचा – IND vs AUS: “रोहित-विराटवर आहे काय निर्णय घ्यायचा पण…”, गौतम गंभीरचं कसोटी भविष्याबाबत मोठं वक्तव्य, मालिकेनंतर काय म्हणाला?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
पॅट कमिन्स – २०० विकेट्स
नॅथन लायन – १९६ विकेट्स
रविचंद्रन अश्विन – १९५ विकेट्स
मिचेल स्टार्क – १६५ विकेट्स
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत ही मालिका ३-१ ने जिंकली. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारताला १५७ धावांत गुंडाळले आणि यजमान संघाला १६२ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ६१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने ४५ धावांत ६ तर कर्णधार पॅट कमिन्सने ४४ धावांत ३ विकेट घेतले.
सिडनी कसोटी जिंकताच ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. यासह ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका विरूद्ध होणार आहे. हा सामना जून महिन्यात ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.