India vs Australia 1st ODI: एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारताविरुद्धची तीन सामन्यांची वन डे मालिका आमच्या तयारीसाठी महत्त्वाची असेल, असे ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने सूचक विधान केले आहे. भारताविरुद्धच्या मोहाली वन डेपूर्वी पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी होत आहे ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे आम्ही किती तयार आहोत विश्वचषकासाठी हे तपासून पाहण्यासाठी चांगली संधी आहे. या मालिकेद्वारे संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघाला आपली हरवलेली लय पुन्हा मिळवायची आहे.”
मोहम्मद सिराजबद्दल विचारले असता कमिन्स म्हणाला की, “आम्ही अद्याप सिराजसाठी कोणतीही योजना आखलेली नाही.” कमिन्सने पुढे सांगितले की, “अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल खेळू शकणार नाही, दुसरीकडे स्मिथच्या मनगटात दुखत आहे. मॅक्सवेल आणि स्मिथच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला मधल्या फळीला अडचणी येऊ शकतात. मात्र, संघात अनेक दमदार अष्टपैलू खेळाडू आहेत. कमिन्सला आशा असेल की तो फलंदाजीत अष्टपैलूची महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल.” एकदिवसीय मालिकेपूर्वी पॅट कमिन्सचे टीम इंडियाला आव्हान दिले. तो म्हणाला, “विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर भारताला हरवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”
भारताचा प्रशिक्षक द्रविड असे काय म्हणाला होता?
तत्पूर्वी, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, “मला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी संपूर्ण संघ तंदुरुस्त ठेवायचा आहे. विराट आणि रोहित सतत सामने खेळत आहेत. अशा स्थितीत त्यना एक-दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अश्विनला गोलंदाजीचा मोठा अनुभव आहे आणि याबरोबरच त्याला आठव्या क्रमांकावर फलंदाजीतही मुख्य भूमिका देता येऊ शकते. ही मालिका अश्विनसाठी ट्रायल नसून केवळ संधी असल्याचे द्रविडने सांगितले.”
दुसरीकडे, त्याचवेळी द्रविडनेही सूर्यकुमारचे खूप कौतुक केले आणि सांगितले की, सूर्या पहिल्या दोन वन डेत खेळेल. भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, “सूर्यकुमार एकदिवसीय फॉरमॅटशी जुळवून घेत आहे आणि लवकरच त्याच्या हातून तुफानी खेळी पाहण्याची आपली सर्वांची इच्छा पूर्ण होईल.” सूर्याने वन डेमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. सूर्याने टी२० मध्ये ४६.०२च्या सरासरीने आणि १७२.७च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात त्याची सरासरी २४.४१ आहे आणि स्ट्राइक रेट ९९.८१ आहे.
ऑस्ट्रेलियाला अलीकडे अनुभवी खेळाडूंच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. कमिन्स, स्मिथ, स्टार्क आणि मॅक्सवेल दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सहभागी होऊ शकले नाहीत. कमिन्स आता तंदुरस्त होत असून तो भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. मात्र, स्मिथ पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण ताकदीने खेळताना दिसत नाहीये.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी)
लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव., अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.