ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ८ डिसेंबरपासून अॅडलेड येथे खेळला जाणार. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी याला दुजोरा दिला.
पॅट कमिन्स दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा संघात समावेश केला आहे. पॅट कमिन्सच्या जागी स्कॉट बोलंडला संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर संघाच्या नेतृत्वाची धुरा स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला स्नायूंच्या ताणामुळे मैदानाबाहेर जावे लागले होते. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथने उर्वरित सामन्याचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन सलग अनेक दिवस कमिन्सच्या दुखापतीवर लक्ष ठेवून होते. आता तो तंदुरुस्त होईल आणि गुलाबी चेंडूच्या कसोटीत संघाची कमान सांभाळेल अशी अपेक्षा होती.
परंतु आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की, पॅट कमिन्स वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. वास्तविक, संघ व्यवस्थापन कसोटी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. म्हणूनच कमिन्सला दुखापतीतून सावरण्याची पूर्ण संधी देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने शानदार प्रदर्शन केले होते. त्याने वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता. ज्यामध्ये यजमानांनी वेस्ट इंडिजचा १६४ धावांनी दारुन पराभव केला.