Pat Cummins likely to miss Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसू शकतो. आपल्या नेतृत्वाखाली कांगारू संघाला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार पॅट कमिन्स या स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. वास्तविक, कमिन्सच्या घोट्याला सूज आली आहे आणि त्यासाठी त्याला स्कॅन करावे लागेल. स्कॅननंतर कमिन्सची दुखापत किती गंभीर आहे हे कळेल. मात्र, रिपोर्ट्सनुसार, कमिन्सला फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मेगा स्पर्धेत खेळणे कठीण वाटत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅट कमिन्सच्या घोट्याला सूज –

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. कमिन्सच्या घोट्याला सूज आहे. कांगारूंच्या कर्णधाराच्या घोट्याचे लवकरच स्कॅनिंग होणार आहे. स्कॅननंतर कमिन्सची दुखापत किती गंभीर आहे हे कळेल. अलीकडेच, कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने चमकदार कामगिरी करत १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश मिळवले आहे. कांगारू संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा ३-१ असा पराभव केला होता.

कमिन्स श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर –

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पॅट कमिन्सलाही विश्रांती देण्यात आली आहे. कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कमिन्स दुखापतीशी झुंजत आहे आणि त्यामुळेच त्याला संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली, कमिन्सने २०२३ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला जेतेपद पटकावून दिले. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयासह ऑस्ट्रेलियानेही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy : ‘हे अनाकलनीय आहे…’, गावस्करांना ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित न केल्याने मायकेल क्लार्कची ऑस्ट्रेलियावर टीका

ऑस्ट्रेलियाचा ब गटात समावेश –

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाला ब गटात ठेवण्यात आले आहे. कांगारू संघ २२ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर संघाचा पुढील सामना २५ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्याचवेळी, ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना २८ फेब्रुवारीला अफगाणिस्तानशी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pat cummins likely to miss champions trophy 2025 due to ankle injury vbm