Pat Cummins said that he was focused on need to keep Rishabh Pant quiet : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्षाच्या अखेरीस पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर होणाऱ्या या मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सचे लक्ष या दोन भारतीय खेळाडूंवर नसून ऋषभ पंतला रोखण्यावर आहे. कांगारू संघाच्या नजरा पंतला रोखण्यावर केंद्रित असतील, असे वक्तव्य पॅट कमिन्सने केले आहे.

ऑस्ट्रेलियासमोर ऋषभ पंतला शांत ठेवण्याचे आव्हान –

कमिन्सचे म्हणणे आहे की पंत हा अशा फलंदाजांपैकी एक आहे ज्याच्याकडे सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या फलंदाजापासून सावध राहण्याची गरज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी नावाच्या कसोटी मालिकेची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणाऱ्या सामन्याने होणार आहे. भारताने सलग दोनवेळा ऑस्ट्रेलियाकडून ही मालिका जिंकली असून आता त्याच्या नजरा हॅटट्रिक करण्यावर असतील. भारताने मागच्या वेळी ऑस्ट्रेलियात कांगारू संघाचा पराभव करून गाबामध्ये विजयाचा झेंडा फडकवला होता. त्या मालिकेतही पंतने महत्त्वाची भूमिका निभावली होती.

पॅट कमिन्स ऋषभ पंतबद्दल काय म्हणाला?

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ऑस्ट्रलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, “ऋषभ पंत हा एक असा खेळाडू आहे, ज्याचा गेल्या काही मालिकांमध्ये मोठा प्रभाव राहिला आहे आणि आम्हाला त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक संघात एक किंवा दोन खेळाडू असतात, जे कधीही सामन्याचा मार्ग बदलू शकतात. तुम्हाला माहीत आहे, आमच्याकडे ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शसारखे खेळाडू आहेत. मला वाटते की या खेळाडूंप्रमाणे तो आक्रमक होत चालला आहेत. त्यामुळे तुम्ही थोडी जरी चूक केली तर तो त्याची भरपाई करण्यासाठी तयार असेल.”

हेही वाचा – रिंकू सिंगने काढलेल्या नवीन टॅटूचा फोटो व्हायरल, नक्की काय लिहिलंय हातावर? जाणून घ्या

ऋषभ पंतची ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी –

रिव्हर्स स्वीप आणि एकहाती फ्लिक्स यांसारख्या अपरंपरागत शॉट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी मालिकेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कालावधीत, पंतने १२ डावांमध्ये ६२.४० च्या प्रभावी सरासरीने ६२४ धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १५९ होती. त्याने २०२१ मध्ये गाबा येथे दुसऱ्या डावात नाबाद ८९ धावा केल्या, ३२ वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव केला आणि भारताला २-१ ने मालिका जिंकून दिली.