Pat cummins says we can’t wait to face India in the World Cup final 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषका २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने अतिम सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.
फायनल खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत –
उपांत्य फेरीतील विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, “आम्ही भारतात वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्हाला माहित आहे की स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले जाईल आणि टीम इंडियाला प्रेक्षकांचाही मोठा पाठिंबा मिळेल. पण आम्ही याचा फायदा घेऊ. आमच्याकडे २०१५ मध्ये विश्वचषक फायनल खेळलेले खेळाडूही आहेत. यातील काही खेळाडूंनी टी-२० वर्ल्ड कप फायनल खेळली आहे.”
पॅट कमिन्स पुढे म्हणाला, “हे खूप खास असणार आहे. वर्ल्ड कप २०१५चा फायनल सामना माझ्यासाठी खूप खास क्षण होता. तसेच मी इथे भारतात पुन्हा वर्ल्ड कप फायनल खेळेन, असे मला कधीच वाटले नव्हते.” अहमदाबादचे हे क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. त्यामुळे साहजिकच या स्टेडियममध्ये भारतीय प्रेक्षकांची संख्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांपेक्षा जास्त असणार आहे.
हेही वाचा – IND vs AUS Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोण पटकावणार विजेतेपद? शोएब मलिकने केली मोठी भविष्यवाणी
जगभरातील कोणत्याही क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय प्रेक्षक मोठ्या संख्येने भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी येतात, ज्यामुळे मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबलही उंचावते. विश्वचषकाचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत १ लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी येतील, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघावर निश्चितच अतिरिक्त ताण निर्माण होईल, हे स्पष्ट आहे.