SRH Captain Pat Cummins: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार असेल. अॅशेस मालिका विजेता कर्णधार, वर्ल्डकपविजेता कर्णधार तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता कर्णधार असा कर्णधारपदाचा तगडा अनुभव कमिन्सच्या नावावर आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने लिलावात तब्बल २०.५ कोटी रुपये खर्चून कमिन्सला ताफ्यात दाखल करुन घेतलं होतं. त्याचवेळी तो संघाचा कर्णधार होणार असे संकेत मिळाले होते. कमिन्स आयपीएल स्पर्धेत याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे. पण या संघांनी त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली नव्हती. वेगवान गोलंदाज असल्याने कमिन्सला दुखापतींची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया कमिन्ससाठी वर्कलोड मॅनेजमेंट राबवतं. एका वेगवान गोलंदाजाकडे संघाची धुरा सोपवणार का असा प्रश्न होता. पण सनरायझर्स व्यवस्थापनाने कमिन्सचीच प्राधान्याने निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कमिन्सने गेल्या वर्षीच्या हंगामातून माघार घेतली होती.

कमिन्सने २०१४ मध्ये आयपीएल पदार्पण केलं. या स्पर्धेत ४२ सामन्यात त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. २०२२ हंगामात कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. आयपीएल स्पर्धेत सगळ्यात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कमिन्स दुसऱ्या स्थानी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या हंगामात एडन मारक्रमने हैदराबादचं नेतृत्व केलं होतं. कुमार संगकारा, कॅमेरुन व्हाईट, शिखर धवन, डॅरेन सॅमी, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, भुवनेश्वर कुमार आणि मनीष पांडे यांनी हैदराबादचं नेतृत्व केलं आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात २०१६ मध्ये सनरायझर्स संघाने जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र वॉर्नर आणि हैदराबाद संघव्यवस्थापन यांच्यात बेबनाव निर्माण झाला आणि संघाची लयच हरपली. वॉर्नरनंतर केन विल्यमसनने नेतृत्व केलं. आता वॉर्नर आणि केन दोघेही हैदराबाद संघात नाहीत.