साखळी गटात आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रास बडोद्याविरुद्ध शनिवारपासून सुरू होणाऱ्या रणजी क्रिकेट सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असला तरी युसूफ व इरफान पठाण यांचे आव्हान त्यांच्यापुढे राहील.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर चार दिवस चालणाऱ्या या लढतीत पठाण बंधूंवर बडोद्याची मुख्य मदार आहे. भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेला युसूफ हा बडोद्याचे नेतृत्व करीत आहे. अंबाती रायुडु हा भारताच्या ट्वेन्टी-२० संघाकडून खेळत असल्यामुळे त्याची अनुपस्थिती बडोद्यास जाणवणार आहे. इरफान पठाण पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० व एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याकरिता उत्सुक असल्यामुळे तो येथे अव्वल दर्जाची कामगिरी करील, अशी अपेक्षा आहे. बडोद्याने बाद फेरीतील प्रवेश जवळ जवळ निश्चित केला आहे.
महाराष्ट्रास यंदाच्या मोसमात फारशी आशादायक कामगिरी करता आलेली नाही. नुकताच त्यांना दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव हीच महाराष्ट्रापुढील जटील समस्या आहे. केदार जाधवने यंदाच्या पहिल्याच रणजी लढतीत त्रिशतक टोलविले होते. हर्षद खडीवाले, विराग आवटे, संग्राम अतितकर, कर्णधार रोहित मोटवानी, अंकित बावणे, चिराग खुराणा यांनी फलंदाजीत चमक दाखविली असली तरी त्यांच्याकडून अपेक्षेइतके सातत्य दिसून आले नाही. त्यामुळेच महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. समाद फल्लाह, श्रीकांत मुंढे, निकित धुमाळ यांनी गोलंदाजीत चमक दाखविली असली तरी एक हाती विजय मिळवून देणारा गोलंदाज महाराष्ट्राकडे नाही हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राचे बाद फेरीतील प्रवेशाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा