लहान असताना ज्या खस्ता आपल्या वाटय़ाला आल्या, त्या सध्याच्या युवा खेळाडूंच्या वाटय़ाला येऊ नये, या धारणेने इरफान आणि युसूफ या पठाण बंधूंनी ‘क्रिकेट अकादमी ऑफ पठाणस्’ची घोषणा केली. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पहिली अकादमी बडोद्यामध्ये सुरू करण्यात येणार असून २०१५ वर्षांच्या अखेपर्यंत देशभरात पन्नास अकादमी उभारण्याचे त्यांचे ध्येय आहे.
या अकादमीमध्ये क्रिकेटच्या ज्ञानाबरोबरच आहारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांची युवा खेळाडूंना मदत मिळणार आहे. किमान आठ वर्षांच्या मुलापासून कितीही वयापर्यंतच्या व्यक्ती यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. या अकादमीतील प्रशिक्षकांना ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या अकादमीमध्ये सुरुवातीला ८-९ आठवडय़ांचा अभ्यासक्रम असेल, त्यानुसार मुलांमधील गुणवत्ता हेरून त्याला मार्गदर्शन करण्यात येईल.
‘‘ज्या शाळांमध्ये क्रिकेटसाठीच्या मूळ सुविधा असतील त्या शाळांकडे आम्ही अकादमीचा प्रस्ताव घेऊन जाणार आहोत. यामध्ये क्रिकेटचे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर सर्व प्रकारचे ज्ञान देण्यात येईल. आम्हाला जे लहानपणी मिळाले नाही, ते या मुलांना मिळायला हवे, हा यामागचा हेतू आहे,’’ असे इरफानने सांगितले. खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा या अकादमीमध्ये मिळतील, असे युसूफने या वेळी सांगितले.