‘‘दक्षिण आफ्रिकेचे आव्हान साध्य करण्यासारखे होते तरी दयनीय फलंदाजीमुळे आमच्या पदरी पराभव पडला,’’ हे पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकचे पत्रकार परिषदेनंतरचे वक्तव्य पराभवाचे शल्य सांगणारे होते. हशिम अमलाच्या ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानपुढे २३५ धावांचे आव्हान ठेवले होते. मिसबाहने अर्धशतक झळकावत संघाला सावरण्याचे काम केले असले तरी अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता न आल्याने त्यांना ६७ धावांनी पराभव पत्करावा लागला. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची ३ बाद ४८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर नसीर जमशेद (४२) आणि मिसबाहने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण जमशेद बाद झाल्यावर पाकिस्तानच्या डावाला खिंडार पडले. एक बाजू मिसबाहने सांभाळली असली तरी दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही आणि पाकिस्तान पराभव स्वीकारावा लागला. मिसबाहने ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. रायन मॅकलेरानने भेदक मारा करत १९ धावांत पाकिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत त्यांचे कंबरडे मोडले.

Story img Loader