शेवटच्या पाच मिनिटांत रवी दलाल याने केलेल्या अष्टपैलू खेळामुळेच पाटणा पायरेट्स संघाने बंगळुरू बुल्सवर ३३-३१ असा रोमहर्षक विजय नोंदवित प्रो कबड्डी लीगमध्ये उपांत्य फेरी गाठली. त्याआधी झालेल्या लढतीत दबंग दिल्ली संघाने पुणेरी पलटण संघाचा ४५-२२ असा सहज पराभव केला.
बंगळुरू संघाला बाद फेरीसाठी पाटणावर विजय मिळवणे अनिवार्य होते. त्यादृष्टीने नियोजनबद्ध खेळ करीत त्यांनी पूर्वार्धात पाटणाविरुद्ध १८-१३ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात पाटणा संघाच्या संदीप नरवाल याने एकाच चढाईत तीन गुण मिळवित संघास २६-२४ अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ रवी दलाल याने चौफेर चढाया व उत्कृष्ट पकडी करीत संघास दोन गुणांनी विजय मिळवून दिला. बंगळुरू संघाचा स्टार खेळाडू मनजित चिल्लर हा सपशेल अपयशी ठरला. पाटणा संघाने ४५ गुणांसह साखळी गटात तिसरे स्थान घेतले आहे.
पुणेरी पलटण व दबंग दिल्ली या दोन्ही संघांचे बाद फेरीचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे केवळ औपचारिकता राहिलेल्या लढतीत दिल्लीने वर्चस्व गाजविले. त्यांनी पूर्वार्धात २०-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्यांनी ही आघाडी वाढवित ४५-२२ असा दमदार विजय मिळविला. त्याचे श्रेय काशिलिंग आडके याने मिळविलेल्या पंधरा गुणांचा मोठा वाटा होता. पुणे संघाकडून वझिरसिंग याने दहा गुण मिळवित एकाकी लढत दिली.