आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा
व्ही. आर. रघुनाथ याने केलेल्या दोन गोलांच्या बळावर गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत थाटात सुरुवात केली. भारताने सलामीच्या सामन्यात चीनवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला.
एस. व्ही. सुनील याने १३व्या मिनिटाला भारताचे खाते खोलले. त्यानंतर पाच मिनिटांनी गुरविंदर सिंग चंडीने केलेला गोलचा प्रयत्न चीनचा गोलरक्षक रिफेन्ग सू याने हाणून पाडला. पण या प्रयत्नात भारताला पेनल्टीकॉर्नर मिळाला. या संधीचे सोने करत रघुनाथने भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताला तिसऱ्या गोलसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. ५२व्या मिनिटाला रघुनाथने पुन्हा एकदा पेनल्टीकॉर्नरवर सुरेख गोल झळकावत भारताला विजयाच्या समीप आणून ठेवले. ५३व्या मिनिटाला भारताच्या खात्यात आणखी एका गोलाची भर पडली. रुपिंदरपाल सिंगच्या पासवर बिरेन्द्र लाकरा याने मारलेला फटका चीनच्या बचावपटूच्या पायाला लागून गोलजाळ्यात गेला.
प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी भारताच्या या कामगिरीची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, ‘‘भारताने सुरेख कामगिरी केली. स्पर्धेतील सुरुवातीचे सामने जिंकण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून झगडत होतो. आता भारताने या स्पर्धेची सुरुवात धडाकेबाज केली.’’    

Story img Loader